Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

निवडणुका लढवणं अन राजकारण करणं हा आमचा धंदा नाही : राजू शेट्टींचा सावध पवित्रा

शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी, वेगवेगळ्या सभागृहात प्रतिनिधी पाठवण्यासाठी असंगाशी संग करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, त्यात आम्हाला चांगले अनुभव आलेले नाहीत

विश्वभूषण लिमये

सोलापूर : निवडणुका (Election) लढवणे किंवा राजकारण करणे, हा आमचा धंदा नाही. शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी, वेगवेगळ्या सभागृहात प्रतिनिधी पाठवण्यासाठी असंगाशी संग करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, त्यात आम्हाला चांगले अनुभव आलेले नाहीत, त्यामुळे यापुढे आम्ही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) किंवा भाजप (BJP) यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशा शब्दांत आघाडी/युतीबाबत माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी भाष्य केले. (will stay away from MahaVikas Aghadi and BJP : Raju Shetti)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आज (ता. ३१ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यात त्यांनी उसाची एफआरपी, काटामारी ओला दुष्काळ याच्यासह महाविकास आघाडी किंवा भाजपबरोबर युती , रवि राणा-बच्चू कडू वाद आदी विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, एकदा आम्ही असंगाशी संग केला आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजपपासून दूर राहण्याचा आमचा निर्णय असणार आहे.

आमदार रवि राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादाबाबत राजू शेट्टी म्हणाले की, खोक्यांच्या प्रभावाने राज्यात मुख्यमंत्री बदलत असेल, तर रवि राणा यांनी दिलगिरी व्यक्त करणे, ही किरकोळ बाब आहे.

ऊस गाळप हंगामाबाबत ते म्हणाले की, साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात काटा मारत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. साखर कारखान्यातील काटे हे संगणकीकृत करावेत, या मागणीसाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी पुण्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढणार आहे. त्याचबरोबर एफआरपीची रक्कम आणि वर दोनशे रुपये शेतकऱ्यांना प्रति टन द्यावेत ही प्रमुख मागणी असणार आहे

ओला दुष्काळाच्या संदर्भात राजू शेट्टी यांनी सांगितले की, कोणत्याही सरकारचे १०० दिवसांत परीक्षण करता येत नाही. या सरकारने आपण लोकोपयोगी सरकार आहोत, अशी चुणूक शंभर दिवसांत दाखवलेली नाही. दहीहंडीत गोविंदाबाबत, गणपतीमध्ये डॉल्बी बाबत जी तत्परता दाखवली, ती शेतकऱ्यांबाबत का नाही दाखवली.महाराष्ट्रात ऊस वगळता एकही पीक अतिवृष्टीमुळे शिल्लक राहिले नाही. मात्र, कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं बोलतात.

ओला दुष्काळाचे निकषात बसत नसेल, तर निकष बदला. पाऊस तरी निकषांत कुठे बसतो. वैश्विक तापमान वाढीमुळे सगळे ऋतू बदललेले आहेत. त्यामुळे बदलत्या काळाप्रमाणे तुम्ही तुमची धोरण बदलली नाहीत तर उपयोग काय. मात्र हे सर्व निकष, धोरण हे मदत देण्यासाठी आहेत की टाळण्यासाठी, हे सरकारने एकदा सांगावे, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT