Manohar Dongre-Rajan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohol Politic's : मनोहरभाऊंसोबत भाजपच्या व्यासपीठावर एकत्र येणार का? राजन पाटलांच्या उत्तरात पुन्हा कटुता दिसली...

Rajan Patil-Manohar Dongre News : राम-लक्ष्मण जोडी म्हणून ओळखले जाणारे राजन पाटील आणि मनोहर डोंगरे आता वेगवेगळ्या राजकीय वाटेवर आहेत. भाजप प्रवेशानंतर पाटील यांनी डोंगरेंवर थेट भाष्य करत चर्चेला उधाण आणले आहे.

Vijaykumar Dudhale
  1. मोहोळ तालुक्यातील राजन पाटील आणि मनोहर डोंगरे ही कधीकाळी “राम-लक्ष्मण” जोडी म्हणून ओळखली जाणारी जोडी सत्तास्पर्धा आणि मान-सन्मानाच्या वादामुळे वेगळी झाली.

  2. डोंगरे पिता-पुत्रांनी भाजपची वाट धरली असताना, आता राजन पाटील स्वतः भाजपमध्ये प्रवेश करून डोंगरे यांच्या राजकीय स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

  3. पाटील यांनी “मनोहरभाऊ आता भाजपमध्ये कुठं आहेत?” असा सवाल केला आहे.

Solapur, 02 November : मोहोळ तालुक्यात मनोहर डोंगरे आणि राजन पाटील ही राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखली जात होती. मात्र, सत्तास्पर्धा, मानसन्मानाच्या वादातून त्यांच्यातील राजकीय अंतर वाढत गेले आणि दोघांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला झाली. मनोहर डोंगरे आणि त्यांचे चिरंजीव विजयराज डोंगरे यांनी भाजपची वाट धरली होती. मात्र, ज्यांच्यापासून दूर गेले, त्याच राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर पाटील यांनी मनोहर डोंगरेंबाबत मोठे विधान केले आहे.

मोहोळ मतदारसंघातून राजन पाटील (RajanPatil) हे आमदार म्हणून निवडून आले होते, तर मनोहर डोंगरे हे सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (दूध पंढरी) अनेक वर्षे अध्यक्ष होते. त्यानंतर राजन पाटील यांनी अनगरच्या माळरानावर उभारलेल्या लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुराही डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरही पक्षाचे जिल्हाध्यक्षपदही मनोहर डोंगरे (Manohar Dongre) यांच्याकडेच सोपविण्यात आले होते. त्यामुळे मोहोळ तालुक्यात राजन पाटील आणि मनोहर डोंगरे यांच्यात सत्तेची विभागणी झाली होती. दोघांमध्ये सुमधुर संबंध होते. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती तिकिट वाटपावेळी दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जाते. तसेच सत्तेच्या मानापमातून दोघांमधले अंतर वाढत गेले. त्यानंतर दोघांच्या राजकीय वाटा वेगवेगळ्या झाल्या.

राजन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहिले, तर मनोहर डोंगरे आणि त्यांचे चिरंजीव विजयराज डोंगरे यांनी भाजपसोबत जाणे पसंत केले. मध्यंतरीच्या काळात मनोहर डोंगरे यांच्यावर हल्लाही झाला होता. त्यातून ते बचावले. मात्र, तेव्हापासून ते सक्रीय राजकारणापासून जरा लांब आहेत. मात्र, मोहोळ तालुक्यातील काही नेत्यांनी नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भाने एक बैठक घेतली आहे. त्या बैठकीला डोंगरेही उपस्थित होते. त्यातूनच राजन पाटील यांनी डोंगरे आता कुठं भाजपत आहेत, असा सवाल केला आहे.

मनोहर डोंगरे यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र येणार का, असा सवाल विचारल्यावर राजन पाटील म्हणाले, मनोहरभाऊ आता कुठं भारतीय जनता पक्षात आहेत? माझ्या माहितीप्रमाणे ते सध्या भाजपमध्ये नाहीत. कारण, मागील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती होती. तरीसुद्धा त्यांनी आम्हाला विरोध केलेला आहे. आताही आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक ते कसलीतरी आघाडी बिघाडी काढून लढायचं म्हणत आहेत.

भारतीय जनता पक्षाने मुंबईत पक्ष प्रवेशाचा एवढा मोठा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाला मोहोळ तालुक्यातील भाजपच्या सर्व प्रामाणिक नेत्यांनी आपल्या गाड्या घेऊन हजेरी लावली. त्या ठिकाणी ते मला काही दिसले नाहीत, याचा अर्थ ते भाजपमध्ये आहेत, असं मला वाटत नाही, असा दावाही राजन पाटील यांनी केला.

Q1. मनोहर डोंगरे आणि राजन पाटील यांचे नाते कसे होते?
A1. दोघे एकेकाळी मोहोळ तालुक्यात “राम-लक्ष्मण” जोडी म्हणून ओळखले जात होते.

Q2. दोघांमध्ये वाद का झाला?
A2. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तिकीट वाटपावेळी सत्तास्पर्धा आणि मान-सन्मानाच्या कारणावरून मतभेद निर्माण झाले.

Q3. सध्या मनोहर डोंगरे कोणत्या पक्षात आहेत?
A3. राजन पाटील यांच्या मते ते आता भाजपमध्ये नसून त्यांची भूमिका अस्पष्ट आहे.

Q4. राजन पाटील यांनी डोंगरे यांच्याबद्दल काय विधान केले?
A4. त्यांनी म्हटलं, “ते आता भाजपमध्ये नाहीत; कारण भाजपच्या मोठ्या कार्यक्रमात ते दिसलेच नाहीत.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT