Solapur News : माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व मान्य केले. उपमुख्यमंत्री पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. राज्यातील या घडामोडींमुळे मोहोळच्या राजकारणाचा गुंता वाढलेला असतानाच माजी आमदार रमेश कदम यांची सुटका झाली आहे. माजी आमदार कदम यांनी राजन पाटील यांचे विरोधक म्हणून कमावलेली प्रतिमा, कदम यांच्यानंतर प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी या विरोधी गटाचे केलेले नेतृत्व यामुळे मोहोळ विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा पाटील विरुध्द पाटील सामना रंगण्याची शक्यता आहे. (With the release of Ramesh Kadam, Mohol's political equations will change)
रमेश कदम यांना २०१४ मध्ये अवघ्या १५ दिवसांत आमदारकी मिळाली. आमदारकीच्या काही महिन्यातच त्यांनी थेट माजी आमदार राजन पाटील यांच्याशी पंगा घेतला. साधारणतः एक वर्षाची आमदारकी त्यांना उपभोगता आली, त्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले. पाटील विरोधक या प्रतिमेमुळे रमेश कदम यांना तुरुंगात असूनही २०१९ च्या निवडणुकीत २३ हजार मते मिळाली असावीत. या निवडणुकीपासूनच माजी आमदार पाटील आणि उमेश पाटील यांच्यात अंतर पडण्यास सुरुवात झाली. माजी आमदार कदम यांच्यानंतर उमेश पाटील यांनी राजन पाटील विरोधी मतांचे प्रतिनिधीत्व केले.
उमेश पाटील यांनी २०१९ ते आतापर्यंत मोहोळच्या राजकारणात कधी थेट तर कधी छुप्या पध्दतीने आपला ठसा उमटविला आहे. २०१९ ते आतापर्यंत उमेश पाटील यांनी मतदार संघातील नागरिकांच्या कामांसाठी मंत्रालयापासून जिल्हा प्रशासन, मोहोळ तालुक्यातील प्रशासनाचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेतला आहे. या माध्यमातूनच त्यांनी तालुक्यात आपला वेगळा गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी आमदार कदम हे सुनावणीनिमित्त सोलापूर न्यायालयात आल्यानंतर त्यांची आणि उमेश पाटील यांची भेट झाली होती. पाटील विरोधामुळे आगामी काळातही त्यांच्यात हा संवाद राहण्याची शक्यता आहे.
मोहोळच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील यांचे विरोधक म्हणून भाजप खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी सभापती विजयराज डोंगरे, संजय क्षीरसागर व नागनाथ क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, संतोष पाटील यांना ओळखले जाते. त्यात आता माजी आमदार रमेश कदम यांचीही भर पडली आहे. पण, या विरोधी गटाचे नेतृत्व करायचे कोणी? हा मात्र कळीचा प्रश्न राहणार आहे.
कोण किती पाण्यात हे निवडणुकीनंतरच समजणार
मोहोळमध्ये २०१९ नंतर भीमा सहकारी साखर कारखाना वगळता एकही मोठी निवडणूक झाली नाही. ‘भीमा’च्या निवडणुकीत माजी आमदार पाटील गटाचा दारुण पराभव झाला. जिल्हा परिषदेच्या २०१७ च्या निवडणुकीत दोन्ही गटाला प्रत्येकी तीन-तीन अशा जागा मिळाल्या होत्या. पण, २०१९ पासून आतापर्यंत मोहोळ तालुक्याच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे सध्या जुन्या ताकदीवरच संदर्भ दिले जात आहेत. जुनी ताकद आणि नवीन बदल याचे नक्की काय परिणाम आहेत? हे पाहण्यासाठी जिल्हा परिषद किंवा आमदारकीची निवडणूक आवश्यक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.