Dilip Swamy, Aniruddha Kamble
Dilip Swamy, Aniruddha Kamble sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महिला सदस्य आक्रमक; अध्यक्ष, सीईओ बाहेर गेल्याने घेतली अभिरूप सभा!

प्रमोद बोडके

सोलापूर : दुपारी अडीचपासून प्रश्‍न मांडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोहोळ पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) सभापती रत्नमाला पोतदार यांना बैठक संपली तरीही प्रश्‍न मांडण्याची संधी मिळालीच नाही. ठरल्याप्रमाणे आढावा बैठक झाल्याने झेडपी (Zilla Parishad) अध्यक्ष अनिरुध्द कांबळे (Anirudh Kamble) सभागृहातील खुर्ची सोडली. जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक असल्याचे सांगत सीईओ दिलीप स्वामी (Dilip Swamy) यांनीही बैठकी सोडली.

बैठक संपली तरीही प्रश्‍न मांडण्याची संधी न मिळालेल्या महिला सदस्यांनी आक्रमक होत झेडपीत आज अभिरूप आढावा बैठक घडवून आणली. विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि प्रशासनासोबत असलेल्या विसंवादामुळे अभिरूप बैठकीचा प्रयोग तब्बल 38 सदस्यांनी यशस्वी करून दाखविला आहे. स्थायी समिती तहकूब झाली, गोंधळामुळे ऑनलाईन सर्वसाधारण सभाही तहकूब करावी लागली. झेडपी सदस्यत्वाची मुदत संपत आली तरीही मांडत असलेले प्रश्‍न काही संपत नसल्याने सदस्यांनी ऑफलाईन आढावा बैठकीचा पर्याय काढला.

नावाला असलेली आढावा बैठक साक्षात सर्वसाधारण सभे प्रमाणेच होत होती. दुपारी अडीचला सुरू झालेली बैठक पाच वाजता संपली. बैठक संपली मात्र, प्रश्‍न मांडायला संधीच न मिळाल्याने आक्रमक झालेल्या महिला सदस्यांनी अभिरूप बैठक घेतली. बैठकीतून अध्यक्ष कांबळे, सीईओ स्वामी व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे बाहेर पडले. या प्रमुखांसोबत वारंवार बोलणाऱ्या सदस्यांनीही बैठक सोडली. महिला सदस्यांनी कृषी सभापती अनिल मोटे यांना बैठकीचे अध्यक्ष करत अभिरूप सभेला सुरुवात केली. या वेळी समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता धांडोरे उपस्थित होत्या. महिला सदस्यांच्या प्रश्‍नाला अभिरूप बैठकीच्या माध्यमातून मोकळी वाट करून देण्यासाठी सदस्य वसंतनाना देशमुख, भारत शिंदे, शिवाजी सोनवणे यांनी मोलाची भूमिका बजावली.

मनातले बोलल्या, पानात येण्याची शक्‍यता कमीच

अध्यक्ष कांबळे व सीईओ स्वामी व्यासपीठावर असताना महिला सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. अध्यक्ष कांबळे व सीईओ स्वामी सभागृहातून बाहेर गेल्यानंतर महिलांचा दबलेला आवाज मोकळा झाला. आम्हाला प्रश्‍न मांडायचे आहेत असे सांगून तब्बल एक तास अभिरूप आढावा बैठक झाली. बैठकीला सामान्या प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्यासह विभागप्रमुखही उपस्थित होते. सदस्या मनातील बोलल्या, सदस्यांनी मांडलेले प्रश्‍न इतिवृत्ताच्या पानात दिसणार का? या प्रश्‍नाचे ठोस उत्तर सध्या तरी प्रशासनाकडे दिसत नाही.

सर्वसाधारण सभा असो की आढावा बैठक महिलांना बोलण्यासाठी उठल्यानंतर संधी व सन्मान दिला जात नाही. महिलांना निधीच्या बाबतीतही डावलले जाते. टर्म संपत आली तरीही आम्ही मांडत असलेले प्रश्‍न न सुटल्याने आज अभिरूप बैठक घेण्याचा निर्णय झाला. असे सदस्या संगीता मोटे यांनी सांगितले. आढावा बैठक असो की सर्वसाधारण सभा, त्यामध्ये प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी मिळायला हवी. सभागृहात महिला सदस्यांचा टक्का जास्त असला तरीही बोलण्याची संधी दिली जात नाही. एखादी महिला प्रश्‍न मांडण्यास उभा राहिल्यास तीचा अवमान केला जातो, असा आरोप सदस्या शैला गोडसे यांनी केला.

सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावांमधील सदस्या बैठक किंवा सर्वसाधारण सभेसाठी लांबून येतात. महिलांना प्राधान्याने बोलण्याची संधी द्यायला हवी. प्रश्‍न मांडण्यासाठी तासन्‌ तास महिला उभ्या राहतात. प्रश्‍न मांडण्याची संधी मिळाली तरीही अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. असे सदस्या ज्योती पाटील यांनी सांगितले. बैठकीला येताना अधिकारी परिपूर्ण माहिती घेऊन येत नाहीत. त्यामुळे महिलांना प्रश्‍न मांडण्याची संधी मिळाली तरीही समाधानकारक उत्तर मिळत नाही. आता माहिती नाही, नंतर माहिती देतो अशी थातूर-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली जाते, असे सदस्या रजनी देशमुख म्हणाल्या.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. जिल्हा परिषदेच्या बैठका व सभांमध्ये मात्र ठराविक सदस्यांना वारंवार बोलण्याची संधी मिळते. महिला सदस्यांना सन्मान सभागृहात राखला जात नाही. महिलांना सदस्यांनी पुढाकार घेत आज अभिरूप आढावा बैठक घडवून आणली आहे, असे सदस्या रेखा राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT