Solapur Voting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Voting : सोलापुरात ‘लाडक्या बहिणी’ ठरवणार आठ मतदारसंघांचे आमदार; जिल्ह्यात 12 लाख महिलांचे विधानसभेसाठी मतदान

Assembly Election 2024 : सोलापूर शहर उत्तर आणि शहर मध्य वगळता उर्वरीत नऊ मतदारसंघांत प्रत्येकी एक लाखाहून अधिक महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यात माढा, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माळशिरस आणि सांगोला या मतदारसंघात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी मतदान केले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 20 November : सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघांसाठी आज (ता. २० नोव्हेंबर) अपवाद वगळता शांततेत ६५.४१ टक्के मतदान झाले. यामध्ये पुरुष मतदारांची टक्केवारी ६६.८१ टक्के, तर महिला मतदारांची टक्केवारी ६३.९४ एवढी आहे. लोकसभा निवडणुकीत १० लाख २४ हजार १६३ महिलांनी मतदान केले होते. त्यानंतर जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट दिसून आला असून आज तब्बल ११ लाख ९९ हजार ९१२ महिला मतदारांनी आपले कर्तव्य बजावले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या या योजनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विधानसभेला महिलांचे एक लाख ७५ हजार ७४९ मतदान जादा झाल्याचे दिसून आले.

सोलापूर (Solapur) शहर उत्तर आणि शहर मध्य वगळता उर्वरीत नऊ मतदारसंघांत प्रत्येकी एक लाखाहून अधिक महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यात माढा, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माळशिरस आणि सांगोला या मतदारसंघात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी मतदान केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी बहुतांश मतदारसंघातील मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या (Voter) रांगा होत्या, त्यामुळे उपलब्ध मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे एकूण मतदानाबरोबर महिला मतदारांची टक्केवारीही वाढू शकते.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान झालेल्या सांगोला मतदारसंघातच सर्वाधिक महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सांगोल्यात ७२. ८४ टक्के मतदान झाले आहे. त्या खालोखाल बार्शी मतदारसंघात ७०.७३ टक्के महिलांनी मतदान केले आहे. सर्वांत कमी ५२.१८ टक्के मतदान सोलापूर शहर मध्य मतदारसंघात झाले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटात पन्नास टक्के सवलत लागू केली होती. त्याचा म्हणावा तेवढा इम्पॅक्ट लोकसभा निवडणुकीत दिसून आला नव्हता. मात्र, लोकसभा निवडणुकीत बसलेल्या झटक्याने महायुती सरकारने महिलांसाठी नव्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेची रक्कम थेट महिलांच्या हाती पडत होती, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला.

जिल्ह्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी मतदान केल्याचे दिसून आले आहे. सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेच्या सुमारे साडेदहा लाख लाभार्थी महिला आहेत. तर आज विधानसभेसाठी झालेल्या मतदानात तब्बल १२ लाख महिलांनी मतदान केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात मतदारसंघनिहाय झालेले महिलांचे मतदान

अक्कलकोट....... ६२.९३ टक्के

सोलापूर दक्षिण..... ५७. ६० टक्के

सोलापूर शहर मध्य....५२.१८ टक्के

सोलापूर शहर उत्तर.... ५३.९५ टक्के

मोहोळ................ ६६.७२ टक्के

माढा..... ६९.०३ टक्के

करमाळा....... ६५.८० टक्के

पंढरपूर....... ६७.७५ टक्के

बार्शी.......... ७०.७३ टक्के

माळशिरस.... ६५.५१ टक्के

सांगोला....७२.८४ टक्के

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT