Solapur, 20 December : आयुष्यात यापुढे मोहिते पाटलांची मदत घेऊन हा राम सातपुते कुठलीही निवडणूक लढवणार नाही. हा माझा पण आहे. एकवेळ राजकारण सोडेन, घरात बसेन. पण, मोहिते पाटलांच्या मांडीला मांडी लावून आयुष्यात कधीच बसणार नाही. ज्या दिवशी तसं घडेल, त्याच दिवशी हा राम सातपुते (Ram Satpute) राजकारणात नसेल, असे चॅलेंज माजी आमदार राम सातपुते यांनी दिले आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहार सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत कलम ८८ अन्वये सिद्ध झाला आहे. सहकार कायद्यातील कलम ७८ च्या तरतुदीनुसार एखादी व्यक्ती सहकारी संस्थेच्या अधोगतीत दोषी आढळत असेल तर त्या व्यक्तीचे इतर सहकारी संस्थांमधील संचालकपद रद्द केले जाते. त्या अनुषंगाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil ) यांच्यासह चौघांना पद रद्द करण्याबाबत प्रादेशिक सहसंचालकांकडून (साखर) नोटीस बजावण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना चॅलेंज केले आहे.
आमदार राम सातपुते म्हणाले, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माळशिरसला आल्यानंतरही रणजितसिंह मोहिते पाटील हे घरात बसून होते. आपण मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री होऊ, म्हणून त्यांनी दोन-चार कोट शिवून ठेवले होते.
भारतीय जनता पक्ष कायद्यानुसार वागणारा पक्ष आहे. एखादी व्यक्ती चुकीची वागली तर त्यावर कारवाई करण्याची एक पद्धत आहे. त्यानुसार कारणे दाखवा नोटीस रणजितसिंह मोहिते पाटील यांना देण्यात आलेली आहे. स्पष्टीकरणासाठी त्यांना सात दिवस देण्यात आलेले आहेत. सात दिवसांत स्पष्टीकरण दिलं नाही तर भारतीय जनता पक्ष एक हजार एक टक्के धक्के मारून मोहिते पाटील यांना पक्षातून हाकलून लावेल, असा दावाही सातपुते यांनी केला.
देवेंद्र फडणवीस हे कायम कार्यकर्त्यांसोबत राहतात. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांच्या भावना माहिती असतात. आमच्या माळशिरस तालुक्यातील हजार दोन हजार कार्यकर्त्यांकडे देवेंद्र फडणवीस यांचा मोबाईल नंबर आहे. तालुक्यात जे घडलं, ते सांगितलं आहे, त्यामुळेच कारणे दाखवा नोटीस, भविष्यात हकालपट्टी, लुटलेल्या संस्था, बुडवलेल्या पतसंस्था हे सगळं निघेल. त्यासाठी राम सातपुते हा गोरगरिबांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करायला तयार आहे, असेही सातपुते यांनी स्पष्ट केले.
माझा पराभव झाला म्हणून मी मोहिते पाटलांच्या पाठीशी हात धुवून लागलो आहे, असे नाही तर मी माळशिरसमधून जिंकलो असतो तरी मोहिते पाटील यांच्या पाठीमागे लागलो असतो. ते जे चुकीचे वागले आहेत, त्यांच्याविरोधात मी लढणार आहे. गेली पाच वर्षे ते माझ्यासोबत होते, कुठेतरी मला मदत केली होती, त्यामुळे शांत होतो. या लुटारूंना सोडायचं नाही, असं माझ्या मनात कायम होतं. आता त्यांच्या विरोधात उघडपणे लढायला तयार आहे, असेही चॅलेंज राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.