Solapur, 23 June : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत 17 जागांपैकी महायुतीने 16 जागा जिंकल्या असून नाशिकच्या जागेवर अपक्ष निवडून आला आहे. सोलापुरातून भाजपचे राजेंद्र राऊत, तर सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम यांनी बाजी मारली आहे. या नवनिर्वाचित आमदारांचे नशीब एवढ जोरावर आहे की, ते काल निवडून आले आणि आज आमदारकीची शपथ घेऊन अधिवेशन सुरू असल्याने विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्याची संधीही मिळाली.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-सातारा, सोलापूर आणि पुणे या तीन मतदारसंघात विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या तीनही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. पुणे मतदारसंघाची निवडणूक तर बिनविरोध झाली होती.
माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदारकी मिळविली. विशेष म्हणजे त्यांची निवड ही बिनविरोध झाली होती. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने विक्रम काकडे हे पहिल्याच एन्ट्रीत बिनविरोध विधीमंडळात पोचले आहेत.
सोलापूर आणि सांगली-सातारा या दोन मतदारसंघात मात्र निवडणूक लागली होती. या दोन्ही जागा भाजपकडे गेल्या होत्या आणि भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या आहेत.
सोलापुरातून राजेंद्र राऊत यांनी वसंत देशमुख यांचा ३६५ मतांनी पराभव केला असून राऊत यांना ४८३ एवढी मते मिळाली असून देशमुख यांना मात्र ११८ इतक्या मतांवरच समाधान मानावे लागले. दोघांनाही आपल्या हक्काच्या मतांपेक्षा अधिकची मते मिळाली आहेत.
सांगली-सातारा मतदारसंघात भाजपचे धैर्यशील कदम यांनी बाजी मारली आहे. या मतदारसंघातून कदम यांना ५९१, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभय जगताप यांना २९५ मतं मिळाली आहेत. कदम यांनी २९६ मतांनी निवडणूक जिंकली आहे.
हे सर्व 17 जण सोमवारी निवडून आले आहेत. पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आज लगेच तातडीने या 17 जणांना आमदारकीची शपथ देण्यात आली आहे. कदम आणि राऊत यांनी ईश्वर साक्ष शपथ घेतली. मात्र, शेवट करताना राजेंद्र राऊत यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय असा जयघोष केला. धैर्यशील कदम यांनी मात्र जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजपा असा नारा दिला. अधिवेशन सुरू असल्यामुळे या आमदारांना तातडीने विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.