sushma andhare, rupali chakanakar  sarkarnama
महाराष्ट्र

Sushma Andhare News: फलटण प्रकरणात मोठी घडामोड,राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरच अडचणीत,अंधारेंनी उचललं सर्वात मोठं पाऊल

Sushma Andhare On Rupali Chakankar: शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी त्यांनी मृत महिला डॉक्टरची महिला आयोगाकडून बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे.

Deepak Kulkarni

Phaltan News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणात सलग पत्रकार परिषदा घेत काही धक्कादायक खुलासे केले आहे. यावेळी त्यांनी राज्य महिला आयोग,पोलिस तपास,प्रशासन यांच्यासह राजकीय नेत्यांबाबतही गंभीर विधानं केली आहेत. आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी आक्रमक पाऊल उचललं आहे. याचदरम्यान,त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी(ता.29)पत्रकार परिषद घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी त्यांनी मृत महिला डॉक्टरची महिला आयोगाकडून बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसच संशयाच्या भोवर्‍यात असल्याचं माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे. त्याचमुळे हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून काढून घेत उच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणीही अंधारे यांनी यावेळी केली.

अंधारे म्हणाल्या, मी पुन्हा पुन्हा सांगतेय, डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी चौकशीच्या फेर्‍यांमध्ये सर्वांना आणावं,जर तुम्ही ऐकणार नसाल, तर दोन नोव्हेंबरपर्यंत वाट पाहणार आहे.आणि तीन नोव्हेंबरला मी फलटण पोलिस स्टेशनला जाणार आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. आणि पुन्हा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) या प्रकरणात पडायचं नाही, असा इशाराही अंधारेंनी दिला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, काल निंबाळकर यांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या. त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितले नाही.पण मुलीच्या सीडीआरबद्दल बोलल्या. आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचा आहे की, पोलिसांना त्या मुलीचा मोबाईल आणि तिचं सीडीआर लीक करण्याचा अधिकार कोणी दिला? हे सीडीआर महिला आयोगाला दिले असं आपण गृहित धरू. मग त्यांनी कोणत्या अधिकाराच्या खाली त्याबद्दल भाष्य केले? त्यांना तो अधिकार आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच जर त्यांना तो अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा व्यक्तीला पदावर ठेवायचा की नाही हा विचार करावा.राष्ट्रीय महिला आयोगाने चाकणकरांकडून तातडीने स्पष्टीकरण मागावे अशी मागणी केली आहे. ‘सुनील तटकरे यांनी चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा. मुख्यमंत्री यांनी या राजीनाम्याची प्रक्रिया तातडीने राबवावी.ती का केली पाहिजे याचं कारण म्हणजे चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी बीडमध्ये तरुणांकडून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे तातडीने चाकणकरांचा राजीनामा घ्यावा असंही अंधारे यांनी म्हटलं.

अंधारे म्हणाल्या,महिला आयोगावरही दुर्दैवानं महिलाच आहे.तरी न्याय मिळत नाही.लाडकी बहीण ऐवजी सुरक्षित बहिणीच्या जाहिराती कराव्यात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसेच आज आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत. आम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधातही कोर्टात जाणार आहोत,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.त्यामुळे चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मला महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात कायदेशीर कोर्टात जाणार आहोत.जर महिला आयोगावरील एखादी व्यक्ती प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन जर राजकीय हस्तक्षेप करत असेल. त्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी ते करावं,भाजपकडे जावं, शिंदेसेनेकडे जावं, कुठं जायचं तिथं जावं. मला त्यात काही म्हणायचं नाही,पण त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी त्या जर एखाद्या लेकमातेवर चिखलफेक करणार असतील,तर ते आम्हांला मान्य नाही असंही अंधारे यांनी म्हटलं.

अंधारे म्हणाल्या,महिला आयोग या विषयावर अजून का काहीही बोललेला नाही? त्यांनी सुपारी घेतली आहे का? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? मी हस्ताक्षराचा अहवाल मागवला आहे आणि तो दोन दिवसांत मला मिळेल असंही त्या म्हणाल्या.

ज्या पध्दतीनं टीव्हीवरील इंटरव्यूहमध्ये पीडितेच्या वडिलांनी तोंडाला फडकं बांधलेलं पाहायला मिळालं. हे सगळे पुरावे बघितल्यावर तुम्हांला तोंडाला फडकं बांधायची गरज नसल्याचंही सुषमा अंधारे म्हणाल्या. तुमचं लेकरू निष्पाप आहे,निष्कलंक आहे,तुमच्यावर ज्याप्रकारे मॉरल प्रेशर तयार केलं जात आहे. तुमची सायकोलॉजी किंवा तुम्हांला डिमॉरलाईज करण्याचा प्रयत्न केला जात आहे.तुमच्यातल्या कुणीही तोंड लपवायची गरज नाही.तुमचं लेकरू हुशार आहे,कर्तबगार आहे,व्यवस्थेनं जर लेकराचा बळी घेतला असेल,तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्यानं आपल्याकडे आलं पाहिजं असंही अंधारे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी तुमची धर्माची लेक म्हणून तुमच्यासोबत असल्याचंही त्या म्हणाल्या.

राजकीय प्रेरित व्यक्तीचा सुनील तटकरेंनी राजीनामा घ्यावा असंही अंधारे यांनी यावेळी नमूद केलं. तसेच महिलेची मृत्यू पश्चात बदनामी महिला आयोगातील महिला करत आहे.बीडमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी टॉवरवर चढून आंदोलन सुरू असल्याचं म्हटलं.तसेच अंधारे यांनी आणखी एक खळबळजनक खुलासा करताना डॉक्टर महिलेच्या हातावर लिहिलेल्या कथित सुसाईड नोटमधील निरीक्षक या शब्दाची वेलांटी चुकली असल्याचा दावा करत पोलिसांच्या तपासाला नवं आव्हान दिलं आहे.

फलटणच्या डॉक्टर महिलेच्या पोलिसांना लिहिलेल्या चार पानी तक्रार अर्जामध्ये तीनं 'पोलीस निरीक्षक' हा शब्द 9 वेळा लिहिला होता. या सर्व 9 वेळा निरीक्षक हा शब्द तीनं निरीक्षक असाच लिहिला होता, त्यातील दोन्ही वेलांट्यांमध्ये कुठलाही बदल तिनं केलेला नव्हता.पण मृत्यूनंतर तिच्या हातावर जी सुसाईड नोट आढळून आली होती, त्यात मात्र निरीक्षक हा शब्द निरिक्षक अशा पद्धतीनं लिहिलेला होता. म्हणजेच शब्दातील वेलाटी चुकल्यामुळं अंधारेंनी संशय व्यक्त केला आहे.

ज्या पद्धतीनं केवळ शब्द चुकल्यामुळं अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचं गूढ उकललं होतं. त्याचप्रमाणे फलटणच्या डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणातही संशय आहे.यावरुन तिची हत्या झाली असावी पण हे लपवण्यासाठी तिच्या हातावर दुसऱ्या कोणीतरी सुसाईड नोट लिहून ती आत्महत्या असल्याचं दाखवण्यात आलेलं असू शकतं,अशी शंका अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT