"देशसेवा हीच खरी सेवा" हे वाक्य अनेकदा ऐकतो. पण हे वाक्य खऱ्या अर्थाने जगणारा एक तरुण म्हणजे खटाव तालुक्यातील काळेवाडी गावचा जवान प्रसाद भरत काळे.
एक महिन्याची सुट्टी घेऊन तो आपल्या विवाहासाठी गावी आला होता. एक मे रोजी त्याचा विवाह वैष्णवी हिच्याशी मोठ्या आनंदात पार पडला. विवाहानंतरचे धार्मिक विधी सुरू असतानाच प्रसादला सैन्य दलातून तातडीने हजर राहण्याचा आदेश मिळाला. लग्नानंतरच्या दुसऱ्याच दिवशी प्रसाद काळे यांना आर्मड रेजिमेंट अमृतसर युनिटमधून तातडीने हजर राहण्याचा आदेश मिळाला.
विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी, अंगावर हळदी आणि हातात मेंदी असतानाच, त्याने ऑपरेशन सिंदूरसाठी सीमेवर निघायचा निर्णय घेतला.
प्रसाद याने केवळ देशसेवेचा विचार करत नववधू आणि कुटुंबाला साक्षी ठेवत भावनांवर नियंत्रण ठेवले. त्याच्या पत्नी वैष्णवीनेही मोठ्या मनाने देशसेवेसाठी पतीला शुभेच्छा दिल्या आणि परवानगी दिली. तिचा हा निर्णय निश्चितच देशसेवेवरील तिच्या निष्ठेचे आणि त्यागाचे प्रतीक ठरतो.
हे नवविवाहित दांपत्य आज संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. एकीकडे नवविवाहाचा आनंद, पारंपरिक पूजा-विधी, कुटुंबाचा उत्सव – आणि दुसरीकडे देशसेवेची तातडी. अशा कठीण प्रसंगी, दोघांनीही राष्ट्रहिताला प्राधान्य दिले, ही बाब त्यांच्या निस्वार्थ वृत्तीची साक्ष देणारी आहे.
2020 मध्ये गावी सुट्टीवर आल्यानंतर गाडीमध्ये राहून क्वारंटाईन होणारा, कुटुंबावर प्रेम करणारा पण नियम पाळणारा सच्चा जवान!
प्रसाद काळे याने यापूर्वीही कोरोना काळात कुटुंबाच्या व गावच्या काळजीपोटी घरासमोरील चारचाकी गाडीत राहून त्याने क्वारंटाईनचा कालावधी घालवला.. या घटनेनेही त्याचा कुटुंबप्रेम आणि शिस्तप्रियता स्पष्ट केली होती.
प्रसाद काळे आणि वैष्णवी हे दांपत्य समाजाला एक अनमोल संदेश देतात – की वैयक्तिक आनंदांपेक्षा राष्ट्रसेवा श्रेष्ठ आहे. त्यांच्या समर्पणाला आणि त्यागाला सलाम! वैयक्तिक आनंदापेक्षा राष्ट्रसेवेला प्राधान्य देणाऱ्या या जोडप्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.