प्राथमिक शिक्षण विभाग हा राज्यातील सर्वात ‘भ्रष्ट’ विभाग असून, या विभागाकडून दिली जाणारी माहिती पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी असते, अशा अनेक गंभीर आरोपांच्या फैरी झाडत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी गुरुवारी विधान परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागाची अक्षरशः लक्तरे काढली. यावेळी सदस्यांनी विचारलेल्या धारदार प्रश्नांना सामोरे जाताना शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची चांगलीच दमछाक झाली.
आमदार सत्यजित तांबे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावर सभागृहात जोरदार आवाज उठवला. राज्यातील सर्वाधिक बदनाम विभागांमध्ये आज शालेय शिक्षण विभागाचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक वर्षानुवर्षे आपल्या प्रकरणांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवत असून राज्यभर आंदोलने सुरू आहेत. ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५’ अस्तित्वात असतानाही वेळेत निर्णय होत नाहीत.
ऑनलाइन प्रणालीच्या नावाखाली लोकांना पुन्हा हार्ड कॉपी जमा करायला लावून हेलपाटे मारायला भाग पाडले जात आहे. ही दिरंगाई केवळ अकार्यक्षमता नसून भ्रष्ट व्यवस्थेला पोषक ठरणारी पद्धत बनली आहे, असा हल्लाबोल तांबे यांनी केला. तसेच, सभागृहात मंत्र्यांकडून प्रत्येक प्रश्नावर ‘खरे नाही...’ असे छापील उत्तर देऊन दिशाभूल केली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या चर्चेत सहभागी होत आमदार संजय भेंडे यांनी शिक्षण विभागातील गोंधळ आणि प्रलंबित शिक्षक नियुक्ती प्रक्रियेकडे सरकारचे लक्ष वेधले. तर आमदार चित्रा वाघ आणि प्रवीण दरेकर यांनी विभागाची माहिती कशी चुकीची आणि विसंगत आहे, हे शासकीय कागदपत्रांच्या आधारेच सिद्ध करून दाखवले.
‘यू डायस’ पोर्टलवरील माहितीही शिक्षकांनीच भरली आहे. मात्र, माहिती भरणाऱ्या शिक्षकांना आपण दोष देत नाही. सर्वांनाच मते हवी असतात, तरीही शिक्षण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आढावा घेतला जाईल आणि विभागातील कोणत्याही अनियमिततेकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. मात्र संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला भ्रष्ट ठरविणे योग्य नाही, कारण हा विभाग समाज घडविण्याचे काम करत आहे. आपणही त्याच व्यवस्थेतून आलो आहोत. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल. - पंकज भोयर, शालेय शिक्षण राज्यमंत्री
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.