MPSC News  Sarkarnama
महाराष्ट्र

MPSC News: पुण्यात MPSC तरुणाचे अपहरण; 21 कॉल, 2 कार अन् पोलिसांचा थरारक पाठलाग, टिळक चौकात शेवट

MPSC Student Kidnapping News: दोघेही पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. ते नारायण पेठ पोलीस चौकीजवळील एकाच इमारतीत राहत असून एका अभ्यासिकेत अभ्यास करत होते.

Mangesh Mahale

Pune News : पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचे तरुणीसोबत बोलल्याच्या रागातून अपहरण करण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींचा पाठलाग केला. दोन कार बदलून पळणाऱ्या आरोपींनी अखेर तरुणाला टिळक चौकात सोडले. दोघांना अटक करण्यात आली.

गुरुवारी पुण्यात ही धक्कादायक घटना नारायण पेठ परिसरात घडली. एका तरुणीसोबत बोलल्याच्या रागातून हॉटेल व्यावसायिकाने साथीदारांच्या मदतीने तरुणाला कारमध्ये जबरदस्तीने कोंबले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला आणि अखेर दोघांना अटक केली.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सागर रमेश बोराडे (३१) आणि किशोर सावंत (३२) यांना ताब्यात घेतले आहे. तर शक्ती हिच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण करण्यात आलेला प्रसाद सूर्यवंशी (२८, रा. बारामती) आणि शक्ती हे दोघेही पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. ते नारायण पेठ पोलीस चौकीजवळील एकाच इमारतीत राहत असून एका अभ्यासिकेत अभ्यास करत होते.

तरुणीसोबत बोलल्याचा राग

प्रसाद आणि शक्ती यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे पोलिसांच्या तांत्रिक तपासातून समोर आले आहे. शक्तीचा मित्र असलेल्या सागर बोराडेला प्रसादचे तिच्याशी बोलणे पसंत नव्हते. त्यामुळे त्याने प्रसादला यापूर्वीच शक्तीसोबत बोलू नकोस, अशी धमकी दिली होती. मात्र, गुरुवारी मध्यरात्री प्रसाद दुचाकीवरून जात असताना सागर आणि त्याच्या साथीदारांनी त्याला अडवले. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर मारहाण करून त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्यात आले.

रूममेटने पाहिला प्रकार, पोलिसांना दिली माहिती

प्रसादला घेऊन आरोपी जात असताना त्याच्या रूममेटने हा प्रकार पाहिला. त्याने प्रसंगाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली.

पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने सागर बोराडेशी संपर्क साधून प्रसादला सोडण्यास सांगितले. त्याला समजावण्यासाठी अधिकाऱ्याने तब्बल २१ वेळा फोन केला, मात्र सागरने एकही कॉल स्वीकारला नाही.

पोलिसांचा माग कळताच दोन कार बदलल्या

पोलिस आपला माग काढत असल्याची चाहूल आरोपींना लागली. त्यानंतर त्यांनी सिंहगड रस्त्यावर पहिली कार सोडली आणि प्रसादला दुसऱ्या वाहनात बसवले. यानंतर आरोपी कात्रजच्या दिशेने निघाले. अपहरण सुरू असतानाही सागर हा शक्तीच्या संपर्कात होता. प्रसादला मारहाण करत असल्याची माहिती तो तिला फोनवरून देत होता.

दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग कायम ठेवला. शहरातील विविध भागांत पोलिसांचा घेराव वाढत असल्याने आरोपींवर दबाव निर्माण झाला.

टिळक चौकात सोडले

पोलिसांकडून सुटका होण्याची शक्यता नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी शहराच्या दिशेने परतण्याचा निर्णय घेतला. अखेर टिळक चौक परिसरात त्यांनी प्रसादला खाली उतरवून तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, विश्रामबाग पोलिसांनी आधीच आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत सागर बोराडे आणि किशोर सावंत यांना पकडले. या कारवाईमुळे अपहरणाचा थरारक घटनाक्रम संपला.

सहा महिन्यांच्या संपर्काची माहिती

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार सागर बोराडे यांचे टिळक चौकात हॉटेल आहे. तांत्रिक तपासात प्रसाद आणि शक्ती हे मागील सहा महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपहरणामागील नेमका हेतू आणि या प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी कॉल रेकॉर्ड्सचीही तपासणी केली जात आहे. शक्तीलाही चौकशीसाठी पोलिसांनी पाचारण केले असून तिचा जबाब नोंदवला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT