Uday Samant Sarkarnama
महाराष्ट्र

Pune Teachers Constituency Election : एकनाथ शिंदेंचा आदेश, रामराजेंनी पुरवलेली ताकद, तरीही शिवसेनेच्या चिवटेंनी 'पुणे शिक्षक'मधून ऐनवेळी का घेतली माघार..? उदय सामंत म्हणतात...

Uday Samant News : गेल्या दोन वर्षापासून निवडणूक लढवण्याची तयारी करीत असलेल्या मंगेश चिवटे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, चिवटे यांनी शुक्रवारी दुपारी शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली.

सरकारनामा ब्युरो

Pune News : पुणे शिक्षक मतदारसंघात होत असलेल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याठिकाणी महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत मैत्रिपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, याठिकाणच्या लढतीत मोठा ट्विस्ट पाहवयास मिळाला. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला हा मतदारसंघ गेल्याने भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी गेल्या 2 वर्षांपासून शिक्षक मतदारसंघासाठी तयारी केली असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. त्यामुळे चिवटे माघार घेणार नाहीत अशी चर्चा रंगली होती. मात्र, चिवटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी मोठे विधान केले आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे व महाविकास आघाडीतील काँग्रेसचे (Congress) आमदार व उमेदवार जयंत आसगावकर यांच्यात लढत होणार आहे. या ठिकाणी माजी आमदार दत्तात्रय सावंत, मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहायक सचिन सानप हे निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे त्यांचे आव्हान महायुतीसमोर आहे. दुसरीकडे या मतदारसंघात गेल्या दोन वर्षापासून निवडणूक लढवण्याची तयारी करीत असलेल्या मंगेश चिवटे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, चिवटे यांनी शुक्रवारी दुपारी शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

मंगेश चिवटे यांना पुणे शिक्षक मतदारसंघातून लढण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. तर त्यांच्यासाठी रामराजे निंबाळकर यांनी फलटणमध्ये प्रचार सभा घेत ताकदही पुरवली होती. त्यामुळे चिवटे निवडणूक लढतील अशी अपेक्षा होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चिवटेंनी पुणे शिक्षक मतदारसंघामधून ऐनवेळी माघार घेतली.

चिवटे यांच्या माघारीनंतर मंत्री उदय सामंत शिर्डीत साईंच्या दर्शनाला आले होते, यावेळी पत्रकारांनी चिवटे यांच्या माघारीबाबत सामंत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. मंगेश चिवटे यांची मी मुलाखत बघितली, त्यांनी असे म्हटले आहे की, निवडणुकीतून अर्ज मागे घेतला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते जे ठरवतील ती रणनीती भविष्यात राहील. तिकीट वाटपात काय झाले, काय नाही झाले? यापेक्षा शिवसेनेच्या (Shivsena) जागा आम्हाला जिंकायच्या आहेत, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. अमरावतीची जागा आम्ही महायुतीमध्ये लढतोय, शिक्षकाच्या ज्या जागा आहेत, पाठीमागे-पुढे झाल्या आहेत, ते बघू काय करायचे ते, असेही सामंत यावेळी म्हणाले.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमाशी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले,'पक्षाचे वरिष्ठ नेते यावर भाष्य करतील, मी लहान कार्यकर्ता आहे.' त्यामुळे, शिवसेना पक्षाचे अधिकृत प्रवक्ते किंवा उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे याबाबत काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT