Mumbai News : राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकीत दूध भाव वाढीच्या मुद्द्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसू नये, यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले आहे. दुधाला हमीभाव मिळावा, यासाठी उपाययोजना केंद्राकडून व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी या पत्रात व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीला कांद्याने सत्ताधाऱ्यांचे डोकेदुखी वाढवली होती. कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून थेट मतदान केंद्रावर गेले होते. अशी आंदोलने देशभर गाजली. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. दूध भाववाढीचा प्रश्न यावरून उत्पादकांनी आंदोलन सुरू केलीत. या आंदोलनाचा निवडणुकी सत्ताधाऱ्यांना फटका बसू नये म्हणून प्रयत्न आहे.
दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केंद्राकडे धाव घेतली आहे. शेती उत्पादित मालाप्रमाणेच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दुधाला आधारभूत किंमत ठरवून देण्याबाबतचा कायदा तातडीने करावा, अशी मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit shah) यांच्याकडे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांना मंत्री विखे यांनी दुग्ध व्यवसायासंदर्भात सविस्तर पत्र दिले असून, राज्यातील दूध व्यवसायाची सद्य परिस्थिती, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या असलेल्या मागण्या आणि राज्य सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची माहिती पत्राद्वारे करून दिली. इतर शेती उत्पादनाप्रमाणेच दुधाला देखील आधारभूत किंमत देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय केल्यास याचा मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना तसेच या व्यवसायाला मिळेल, असा विश्वास मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) यांनी पत्रात व्यक्त केला आहे.
राज्यातील ग्रामीण भागात दूध व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. छोटे शेतकरी, महिला आणि युवकांचे या व्यवसायात मोठे योगदान असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला या व्यवसायातून मोठे पाठबळ मिळाले असल्याचे नमूद करत, उन्हाळी आणि हिवाळी हंगामात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटर यांच्या किमती घसरल्याने याचा परिणाम दुधाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
दूध दरातील या चढ उताराचा मोठा सामना शेतकऱ्यांनाही करावा लागतो. ही वारंवार उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन दूध उत्पादकांना दिलासा देण्याचा निर्णय तातडीने होणे गरजेचे असल्याचे मंत्री विखे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या सर्व संकटात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघाकडून मिळणारा दर अत्यंत कमी आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महायुती सरकारने प्रतिलिटर 30 रुपये दर संघानी देण्याबाबत व 5 रुपयांचे अनुदानही देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 35 रुपये दर मिळावा हा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, दुधाला आधारभूत किंमत ठरविण्याबाबत केंद्र सरकारच्या स्तरावर निर्णय झाल्यास त्याचा मोठा आधार दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत किमतीचा निर्णय पाठबळ देणारा ठरेल, अशी अपेक्षा मंत्री विखे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
या अगोदरही मंत्री विखे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडून दुधाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी मंत्री राधाकृष्ण विखे सातत्याने प्रयत्न करत आहेत. राज्याचे सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्य करत असून लवकरच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा सरकारच्या माध्यमातून मार्गी लावले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.