<div class="paragraphs"><p>Rahul Gandhi and Bhai Jagtap</p></div>

Rahul Gandhi and Bhai Jagtap

 

Sarkarnama

महाराष्ट्र

काँग्रेसचा सुवर्णमध्य : संघर्ष टाळत राहुल गांधींची सभा पुढे ढकलण्याचा निर्णय

सरकारनामा ब्युरो

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची २८ डिसेंबरची मुंबईतील नियोजित सभा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यावर घोंगावत असलेले ओमिक्रॉनच्या (Omicron) संकटामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींची हि सभा रद्द झाली नसून मेळाव्याची पुढची तारीख लवकरच कळवली जाईल, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. सोबतच सभेच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिकाही मागे घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

भाई जगताप पुढे म्हणाले, राहुल गांधी यांची सभा रद्द झाली असली तरी काँग्रेसचा १३७ वा स्थापनादिन साजरा केला जाणार आहे. तेजपाल ऑडिटोरीयममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. राज्यसरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे पालन करतच काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा केला जाईल. तसेच त्या दिवशीच्या कार्यक्रमात राहुल गांधी व्हर्च्युअल सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करत असल्याचेही जगताप यांनी सांगितले.

मात्र आता सभा पुढे ढकलण्याचा हा निर्णय म्हणजे राज्य सरकारसोबतचा संघर्ष टाळण्यासाठी उचललेले पाऊल आहे अशी चर्चा रंगली आहे. कारण राहुल गांधी यांच्या सभेला राज्य सरकारने परवानगी दिलेली नव्हती. मागच्या १५ दिवसांपासून काँग्रेस या सभेच्या परवानगीसाठी प्रयत्न करत होते. मात्र सरकारकडून त्यावर कोणतेही उत्तर मिळाले नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi Government) सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू लागला असून, ओमिक्रॉनचाही धोका वाढला आहे. यामुळे राहुल गांधींच्या आगामी दौऱ्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना काही दिवसांपूर्वी विचारणा करण्यात आली होती. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर राहुल गांधींच्या दौऱ्याला परवानगी देण्याबाबत आम्हाला विचार करावा लागेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT