Prakash Mahajan, eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

MNS leader joins Shiv Sena : राज ठाकरेंचा विश्वासू शिलेदार आता शिंदेंचा साथीदार; ऐन निवडणुकीत मनसेला मोठा धक्का!

MNS leader joins Shiv Sena Shinde faction : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेतून मोठा धक्का, विश्वासू नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश.

Rashmi Mane

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मनसेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र, आता या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला असून प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

प्रकाश महाजन हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रिय होते आणि पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षातील अंतर्गत मतभेद, कार्यपद्धतीबाबत असलेली नाराजी आणि काही निर्णयांबाबत असहमती यामुळे ते अस्वस्थ होते. या नाराजीतूनच त्यांनी 13 सप्टेंबर रोजी मनसेचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.

मनसेतून बाहेर पडल्यानंतर महाजन नेमका कोणता निर्णय घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. बुधवारी, २५ तारखेला त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांनी अधिकृतपणे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे हा प्रवेश कोणत्याही मोठ्या गाजावाजाविना, शांतपणे पार पडला. ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांवर याचा नेमका काय परिणाम होणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. ठाकरे बंधूंमधील युतीची घोषणा झाल्यानंतरही भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आगमन सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. प्रकाश महाजन यांचा प्रवेश हा त्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

मनसेतून बाहेर पडताना प्रकाश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. वय वाढत असताना काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असल्याने आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले होते. कोणावरही वैयक्तिक राग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले असल्याचे कधीही लपवले नसल्याचे त्यांनी नमूद केले होते. संघाच्या संदर्भात बोलताना राज ठाकरे यांना आपण घाबरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. त्यांच्या या विधानांनंतर आणि आता शिंदेसेनेतील प्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT