Pune News : बारामतीच्या गोविंदबागेत पवार कुटुंबीयांकडून दरवर्षी दिवाळी पाडवा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मात्र, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे. अजितदादांचे चुलत बंधू व कृषी विकास प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी 'अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी वाटतेय,' अशी भावना व्यक्त करत दिवाळीतील लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'लहानपणापासूनच्या एकत्रित दिवाळ्या खूप जिव्हाळ्याच्या होत्या. तासेब(अनंतराव) फटाके आणत, सर्वांना समान वाटून देत. फटाके दिवसभर पुरवून वापरण्यासाठी अंधाऱ्या कोठडीतील घडवंचीवरील पोत्याच्या भकश्यात कोणाला सापडू नये म्हणून आपण लपवून ठेवत होतो. त्यावेळी नवीन असलेले पॅराशूट उडाले की ते पकडायला काट्या-कुट्यातून धावत होतो, अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू एकत्र करून दुसर्या दिवशी पेटवत होतो.'
'आजीच्या धाकाने आपले घरदार सुतासारखे सरळ चालत होते, आता तू असतास तर वेगळा धाक व प्रेम राहिले असते. दिवाळीला ND पाटील (आत्यामुळे मामा) आले की घर गप्पांनी भरून जाई. ते वेगळ्या पक्षाचे, स्वतःच्या वैयक्तिक तत्त्वांचे पण त्यांचे प्रत्येक वयातील व्यक्तीशी जमायचे. पक्ष व आपले तत्व हे वेगळे ठेवून नाती जपायची असतात हे शिकलो,' असे राजेंद्र पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
'त्याकाळी एवढ्या पाहुण्यांना टोपलीचा एकच संडास; मग चिल्या-पिल्यांना पत्र्यामागे ओळीने बसावे लागे, अशावेळी पुढे मागे सरकावे लागे या अनुभवामुळे भविष्यात कोणाशीही जमवून घेणे आपल्याला सोपे गेले. घरामागच्या आडावर अर्धी आमराई पाणी भरायची, पहाटेपासून कावडीचे कुई-कुई आवाज चालायचे. यावेळी पायरीवर बसून विटकर घासून किंवा राखेची राखुंडी दाताला लावत असताना आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये समाजाचाही वाटा असतो ही शिकवण मागच्या पिढीने आपल्याला दिली. घरट्यातून पडलेली पक्ष्यांची पिलं सापडली की, आपण फिरस्त्या शेळीचे दूध काढून त्यांना पाजत होतो,' या लहानपणीच्या आठवणींना राजेंद्र पवारांनी उजाळा दिला आहे.
राजेश खन्ना स्टाइलचे कपडे
'तुझ्या कपड्याच्या वेगळ्या आवडी-निवडीमुळे राजेश खन्ना स्टाइलचे कपडे फक्त तुलाच होते. दिवाळ्या येत-जात राहणार पण लहानपणी टोचलेल्या काट्यांच्या आठवणींची कुरूपं मात्र आता बोचून एकटेपणा देत राहणार. मी शेती करत बारामतीत राहिलो तशीच माझी मुलं पण इथंच राहिली. तुम्ही भावंडं मुंबईला गेलात, तुमची मुलं तिथंच जन्मली, वाढली, परदेशी शिकली. या साऱ्या पुढील पिढ्यांना आपली लहानपणाची आपुलकीची दिवाळी कशी समजणार? आपल्या नात्यातील घट्ट विण व आपले ऋणांनुबंधाचे हळवे धागे कसे समजणार? प्रत्येक प्रसंगात आठवण काढणे एवढेच मागे राहिले आहे, असे राजेंद्र पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.