Mumbai News : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे कर्जमाफीची घोषणा करण्यात आल्याने विरोधकांकडे आता विरोधासाठी प्रभावी अस्त्र राहिले नाही. दुसरीकडे मात्र सभागृह सुरु असताना भाजपच्या मंत्री, आमदारांनी दांडी मारल्याने प्रदेशाध्यक्ष चव्हाण नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काळात सभागृहातील नेतेमंडळीला शिस्त लावण्यासाठी आता रवींद्र चव्हाण हे मंत्री व आमदारांचा वर्ग घेणार असल्याचे समजते.
भाजपचे (BJP) आमदार आणि मंत्री हेच दांडी मारत आहेत. त्यामुळे अधिवेशन काळात राज्यातील आमदारांना लक्षवेधी मांडत असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता या आमदार आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण बैठक घेणार असून या बैठकीत ते आमदार आणि मंत्र्यांचा क्लास घेणार आहेत.
रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मंगळवारी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना तर बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, ठाणे-कोकण आणि मुंबईमधील मंत्र्यांची बैठक आयोजित केली आहे. तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भाजपचे मंत्री व आमदारांना शिस्तीचे धडे देणार आहेत.
भाजपकडून नेहमीच सभागृहात शिस्तीचे पालन केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसापासून राज्यात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप मंत्री व आमदारांनी शिस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे पुढे आले आहे. त्याच मुळे आता या सर्व मंत्र्यांचे कान टोचले जाणार आहेत.
सभागृहात एकाद्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना सत्ताधारी बाकांवरील ही 'दांडी' पक्षाच्या प्रतिमेला तडा देणारी ठरली असून, चव्हाणांनी या बेशिस्तीचा पाढा जाहीरपणे वाचला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले असताना, त्यांना उत्तर देण्यासाठी अनेक महत्त्वाचे मंत्री आणि आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. मंत्र्यांनी आणि आमदारांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता दांडी मारली, त्यांच्यावर आता प्रदेशाध्यक्ष चव्हाण काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.