Maharashtra Political News : सचिन अहिर यांनी अचानक एकनाथ शिंदे शिवसेनेकडून विधान परिषद उपसभापतीपदावर उमेदवारी अर्ज दाखल करत बिनविरोध निवडून आले. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
यामागे शिवसेना ठाकरे पक्षातून बंडखोरी केलेले खासदार संजय दिना पाटील यांची महत्त्वाची भूमिका असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यात राबवलेल्या चर्चित ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेना ठाकरे पक्षातील सहा खासदारांना मोठी गळती लागली. या सहा खासदारांनी नंतर उघडपणे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकीकडे उद्धव ठाकरे आपल्या खासदारांच्या मतदारसंघात ‘निष्ठेची वज्रमूठ’ मेळावे घेत होते, तर दुसरीकडे पडद्यामागे राजकीय समीकरणं वेगाने बदलत होती आणि त्याच काळात सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे पक्षातील (ShivsenaUBT) या सहा खासदारांना शिंदे शिवसेनेत आणण्यात सचिन अहिर यांनीही मोठी भूमिका बजावली. याच योगदानाची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषद उपसभापतीसारखं महत्त्वाचं पद देत मोठं राजकीय बक्षीस दिल्याची चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, खासदारांची बंडखोरी सुरू असताना संजय दिना पाटील आणि सचिन अहिर यांच्यात सातत्याने संपर्क सुरू होता. संजय दिना पाटील यांना शिंदे शिवसेनेकडे वळवण्यात सचिन अहिर यांचा प्रभाव निर्णायक ठरल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर स्वतः सचिन अहिर यांनीही आकसत चाललेल्या शिवसेना ठाकरे पक्षाला अखेर ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतल्याचं आता स्पष्ट होत आहे.
संजय दिना पाटील आणि सचिन अहिर यांची मैत्री राज्याच्या राजकारणात सर्वश्रुत मानली जाते. याच मैत्रीच्या माध्यमातून पुढे अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचं सांगितलं जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, सचिन अहिर यांचा संपूर्ण राजकीय प्रवास पाहिला तर ते नेहमी सत्तेच्या केंद्राजवळ राहिलेले दिसतात.
याआधीही मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरण बदलण्याच्या हालचालींमध्ये त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. शिवसेना आणि भाजप यांच्यातील नगरसेवकांच्या संख्येचा फरक अत्यंत कमी असताना काही नगरसेवक भाजपमध्ये येण्यास तयार असल्याचा संदेश सचिन अहिर यांनी दिल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या.
त्यावेळी राजकीय परिस्थितीमुळे तो प्रयोग झाला नाही. मात्र सचिन अहिर यांचा शिवसेना ठाकरे पक्षापासून मानसिकदृष्ट्या दूर जाण्याचा प्रवास तेव्हापासूनच सुरू झाला होता आणि आता विधान परिषद उपसभापतीपदाच्या रूपाने त्या प्रवासावर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात ही केवळ एका नेत्याची पक्षांतराची घटना नसून, शिवसेना ठाकरे पक्षासाठी हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.