

Operation Tiger Maharashtra : राज्यात राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेला यश मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद थेट दिल्लीपर्यंत वाढल्याचे चित्र दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असून, शिंदे गटाच्या वाट्याला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घडामोडींमुळे सध्या एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) बुलढाणा येथील केंद्रीय मंत्री असलेले प्रतापराव जाधव यांच्या मंत्रिपदावर संकट निर्माण होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल सहा खासदार आपल्या गटात आणल्याचा दावा केला जात आहे. इतकेच नाही तर शिवसेना ठाकरे पक्षातील आणखी 14 आमदार संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या संपूर्ण ऑपरेशनमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावल्याच्या चर्चाही जोर धरत आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आता केंद्रात शिंदे शिवसेनेची ताकद वाढल्याने खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना मोदी मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मात्र या समीकरणात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या जागी कोणाला संधी द्यायची, याबाबत शिंदे गटात सध्या पडद्यामागे चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. या शर्यतीत सुरुवातीला मुंबई दक्षिण मतदारसंघातील बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात होते. मात्र पत्रकारांबाबत केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांचे नाव आता मागे पडल्याची चर्चा आहे.
यानंतर आता धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांचे नाव चर्चेत आले आहे. ओम राजेनिंबाळकर, संजय दिना पाटील किंवा आणखी एखादा तिसरा चेहरा, यापैकी कोणाला दिल्लीची संधी मिळते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.