Government benefit for Samagra Shiksha staff Sarkarnama
महाराष्ट्र

Samagra Shiksha: समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या 3 हजार 276 जणांना सरकारकडून मोठं गिफ्ट

Samagra Shiksha Abhiyan Maharashtra News: समग्र शिक्षा अभियानातील १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या ३२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीतील पदांवर नियुक्ती देण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय.

Sudesh Mitkar

Pune News: समग्र शिक्षा अभियानांतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या राज्यातील ३ हजार २७६ कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ३० जून २०२६ रोजी दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव अनिरुद्ध कुलकर्णी यांनी याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी जारी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशी आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

दहा वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना लाभ

समग्र शिक्षा अभियानात अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत स्थैर्य मिळावे, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या कंत्राटी पदांच्या समकक्ष शालेय शिक्षण विभाग किंवा इतर विभागातील नियमित संवर्गातील मंजूर पदांच्या समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदांवर नियुक्ती देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन संबंधित पदाच्या वेतनश्रेणीनुसार निश्चित केले जाईल. तसेच सातवा वेतन आयोग लक्षात घेऊन संबंधित पदाची वेतनश्रेणी लागू केली जाणार आहे.

वेतनासोबत महागाई भत्ता, प्रवास भत्त्याचाही लाभ

या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे सध्याचे वेतन संरक्षित राहणार असून, त्यांना मूळ वेतनासोबत महागाई भत्ता आणि प्रवास भत्त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र, अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन यांसारखे लाभ मिळणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

सध्या लागू असलेल्या रजा या कर्मचाऱ्यांना लागू राहतील. संबंधित कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर, राजीनामा दिल्यानंतर, मृत्यू झाल्यास किंवा अन्य कारणामुळे सेवा संपुष्टात आल्यास संबंधित अधिसंख्य पद आपोआप रद्द होणार आहे.

पुढे कंत्राटी पद्धतीऐवजी सेवा करार

समग्र शिक्षा अभियानातील मनुष्यबळाची नियुक्ती थेट कंत्राटी पद्धतीने न करता बाह्यस्रोत किंवा सेवा करार पद्धतीने करण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. त्यामुळे भविष्यात या अभियानातील मनुष्यबळ भरतीची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. एकूणच, वर्षानुवर्षे कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या ३ हजार २७६ कर्मचाऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे सेवेत मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT