Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा वाढला आहे. सत्ता स्थापनेसाठी 31 सदस्य आवश्यक आहेत. तितके संख्याबळ एकाही पक्षाकडे नाही. प्राथमिक पातळीवर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनसोबत सत्ता स्थापनेच्या चर्चा चालू केल्या आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी भाजप सोडून अन्य पक्षांना एकत्र आणण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत.
संख्याबळाच्या बाबतीत 18 जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे 11 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 सदस्य असे 30 पर्यंतचे संख्याबळ आहे. दुसऱ्या बाजूला भाजपकडे 16 सदस्यांचे संख्याबळ आहे. याशिवाय जनसुराज्य 1 आणि रयत क्रांती 1 असेही दोन्ही सदस्य भाजपसोबत आहेत. या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आणि शिवसेनेचे 7 सदस्य किंगमेकरच्या भूमिकेत आहे. पण या दोन्ही पक्षांची भूमिका भाजपसोबत सत्ता नको अशी आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपने सावध पवित्रा घेत सत्ता स्थापनेची कोणतीही रणनीती उघड केली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पत्ते खुले केले नाहीत. सोमवारी (16 फेब्रुवारी) पाटील यांनी शिवसेना आमदार सुहास बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय पाटील यांच्यासोबत मिरज गेस्ट हाऊसला बैठक घेतली. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेणे भाजपसाठी सध्या प्रचंड अवघड बनले आहे. त्यामागे कारणही तशीच आहेत. सत्ता स्थापनेचं हे त्रांगडं सोडवण्यासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष घालावे लागणार आहे.
सत्ता स्थापनेच्या भाजपपुढील अडचणी :
भाजपचे 16 सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी 8 सदस्य एकट्या जत तालुक्यातून निवडून आले आहेत. यामागे आमदार गोपीचंद पडळकर यांचा करिश्मा मानला जातो. शिवाय आटपाडीतील निंबवडे गटातून भाजपच्या माधवी पडळकर याही निवडून आल्या आहेत. त्यामुळे 16 पैकी 9 सदस्य हे गोपीचंद पडळकर यांना मानणारे असल्याचे दिसून येते. त्यापाठोपाठ भाजपचे मिरज तालुक्यातून 6 आणि वाळवा तालुक्यातून एक सदस्य निवडून आला आहे.
थोडक्यात अध्यक्ष करायचा झाल्यास तो पडळकर यांच्याच गटातील असणार हे निश्चित आहे. पण पडळकरांना हे अध्यक्षपद मिळवणे सोपे नाही. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा अध्यक्ष होऊ शकत नाही. या पाठिंब्यासाठी भाजपला आमदार सुहास बाबर यांच्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. कारण शिवसेनेचे 7 पैकी 6 सदस्य एकट्या सुहास बाबर यांनी निवडून आणले आहेत. मात्र पडळकर विरुद्ध बाबर हा संघर्ष बघता पडळकरांच्या अध्यक्षाला बाबर यांच्याकडून विरोध होऊ शकतो.
राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाने पाठिंबा द्यायचा तर तिथेही बरंच राजकारण आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील 6 गट उघड झाले आहेत. यात ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार अजित घोरपडे असे विविध गट सक्रिय आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेत 6 सदस्य निवडून आले आहेत. पण हेही सहाही जण कोणा एकाच्या कह्यात नाहीत. कारण यातील 6 सदस्य 6 वेगवेगळ्या तालुक्यांमधून निवडून आले आहेत आणि हे सहाही जण वेगवेगळ्या नेत्यांना मानणारे आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या समर्थकाला काही तरी मोठे मिळावे यासाठी धडपड आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आहेत. पण त्यांचा एकही समर्थक निवडून आलेला नाही.
माजी खासदार संजयकाका पाटील यांचा कवठे महांकाळ तालुक्यातून देशिंग आणि तासगाव तालुक्यातून माणेराजुरी गटातून एक सदस्य निवडून आला आहे. माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचा वाकुर्डे बुद्रुक गटातून, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा करगणी गटातून, माजी आमदार विलासराव जगताप यांचा जत तालुक्यातून आणि माजी आमदार अजित घोरपडे यांचा मिरज तालुक्यातून एक सदस्य निवडून आला आहे.
अजितदादा असताना हे सगळे एका नेतृत्वासाठी काम करत होते. पण त्यांच्या निधनानंतर हे सहाही जण कोणाचे ऐकणार असा प्रश्न आहे. शिवाय संजयकाका पाटील अध्यक्षपदाची मागणी करत आहेत. भाजपने राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर ओळखून त्यांना अध्यक्षपद दिलेही तरी कोणत्या गटाला मिळणार? आणि इतर गट हे अध्यक्षपद मान्य करणार का? हा प्रश्न आहे. उपाध्यक्ष किंवा इतर दुसरे मोठे पद दिले तरी त्याबाबत हीच अवस्था असणार आहे.
महाविकास आघाडी पुढची एकमेव अडचण :
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एकत्रित संख्या 30 होते. त्यांना बहुमतासाठी एका सदस्याची गरज आहे. बहुमतासाठी जयंत पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बोलणी करत आहेत. पण राज्यातील सत्तेत एकत्र असलेले पक्ष भाजपला सांगलीमध्ये दुखावणार का? ती रिस्क कोणाच्या भरवशावर घ्यायची? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही रिस्क घेऊ देणार का? असे अनेक प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.