

रवीद्र चव्हाण यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांना बळ दिल्याचा आरोप होत आहे.
नितेश राणे यांनी यापूर्वीच महायुतीत मिठाचा खडा टाकल्याचा आरोप केला होता.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकालानंतर जिल्ह्यात राणेंची पकड असल्याचे सिद्ध झाले होते. तर महायुती बहुमताने सत्तेवर बसणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पण सावंतवाडी विधानसभा मतदार संघात जवळपास अर्धा डझन अपक्षांनी विजय मिळवला होता. हे अपक्ष भाजप किंवा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाडून जिल्हा परिषद सदस्य झालेत. यानंतर भाजप नेते पालकमंत्री नितेश राणे यांनी या अपक्षांना अदृश्य शक्तींनी साथ दिली, रसद पुरवल्याचा आरोप करत अपक्षांना साथ देणाऱ्या अदृश्य शक्तींसह अपक्षांनाही इशारा दिला. तसेच भाजपच्या विरोधात काम करणाऱ्या हातांना बाजूला करण्याची वेळ आली असून मदत करणारे हात बाजूला केले जातील असे म्हटले होते. यानंतर जिल्ह्यात याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
यादरम्यान आता या ‘अदृश्य शक्ती’चा पडदा फार्श झाला असून बंडखोर मायकेल डिसूजा यांच्या विजयानंतरच्या लागलेल्या बॅनरवरून नवा वाद सुरू झाला आहे. डिसूजा यांच्या बॅनरवर रवींद्र चव्हाण यांचे फोटो झळकल्याने थेट त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. तर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. तर चव्हाण यांनीच मेहुणे विनोद राऊळ यांच्या माध्यमातून भाजप किंवा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्षांना बळ दिल्याचे बोलले जाऊ लागले आहे. असा थेट आरोपच भाजपमधील एका गटाने केला आहे.
यामुळे आता नगरपरिषद निवडणुकीनंतर नुकताच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नारायण राणे आणि राणे बंधुंचं महत्त्व कमी करण्यासाठीच अपक्ष उमेदवारांना छुप्या पद्धतीने बळ दिले जात असल्याची चर्चा रंगील आहे. तर अपक्षांना बळ देणारे अदृश्य हात चव्हाण यांचे मेहुणे विनोद राऊळ यांचेच असल्याची चर्चा सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात रंगली आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे महायुतीत मिठाचा खडा टाकत असल्याचा हल्लाबोल देखील होताना दिसत आहे.
दरम्यान दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे खासदार नारायण राणे , मंत्री नितेश राणे व आमदार नीलेश राणे यांचा करिष्मा पाहायला मिळाला होता. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार निवडून आले होते. या विजयामुळे राणेंच्या वर्चस्वाला काही प्रमाणात धक्का बसल्याची चर्चा सुरू झालीय. तर नेतृत्व करणाऱ्या खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यावर आत्मपरीक्षणाची वेळ आल्याची कुजबूज सुरू झाली होती.
यावरूनच भाजप नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले होते. तर अपक्षांच्या विजयामागे अदृश्य शक्तींचा हात असून छातीवर कमळ लावून काही नेते आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना पाडण्यासाठी ताकद लावत होते, असा आरोप केला होता. या आरोपानंतर आता राणेसमर्थक थेट अदृश्य शक्तींचे नाव घेत आरोप करताना दिसत आहेत.
कोलगाव जिल्हा परिषद गटातून मायकेल डिसूजा यांनी बंडखोरी करत भाजपला आव्हान निर्माण केले होते. त्यांनी येथे भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा पराभव केला. यानंतर डिसूजा यांनी आपल्या श्रेय रवींद्र चव्हाण यांना देणार असे म्हणत त्यांचे पोस्टर लावले. तर त्यांच्या समर्थनार्थ रवींद्र चव्हाण यांचे मेहुणे विनोद राऊळ यांच्या समर्थकांनी विजयाच्या घोषणाही दिल्या. ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
यानंतर हे बॅनर आपण नाही तर आपल्या कार्यकर्त्यांनी लावल्याचे सांगत या विषयावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न मायकल डिसूजा यांनी केला आहे. पण मंत्री नितेश राणे आरोप करणारे अदृश्य हात रवींद्र चव्हाण यांचे असल्याची येथे उलट सुलट राजकीय चर्चा रंगलीय.
1. रवींद्र चव्हाण यांच्यावर नेमका कोणता आरोप आहे?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊन भाजप उमेदवारांविरोधात काम केल्याचा आरोप आहे.
2. हा आरोप कोणी केला आहे?
भाजपमधील एका गटाकडून तसेच यापूर्वी नीलेश राणे यांनी सार्वजनिकरित्या टीका केली होती.
3. कोणत्या निवडणुकांनंतर हा वाद उफाळला?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
4. या प्रकरणात विनोद राऊळ यांचे नाव का येत आहे?
त्यांच्या माध्यमातून अपक्षांना बळ दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
5. या वादाचा महायुतीवर परिणाम होऊ शकतो का?
अंतर्गत मतभेद वाढल्यास महायुतीतील समन्वयावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.