Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut reacts after Sachin Ahir's move to support the Mahayuti's Legislative Council Deputy Chairperson candidature. Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'बेईमानीचा कीडा घेऊन आलेल्यांच्या जाण्याचं दुःख कशाला?' सचिन अहिरांवर संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut, Sachin Ahir, Uddhav Thackeray: सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीची उमेदवारी स्वीकारल्यानंतर संजय राऊत यांनी एक्सवरील भावनिक पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले.

Jagdish Pansare

Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अख्खा रिकामा करण्याचे उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांना फोडत थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली. महायुतीकडून अर्ज दाखल केल्यानंतर सचिन अहिर फुटल्याचे समोर आले.

विश्वास तरी कोणावर ठेवावा, अशी काहीशी परिस्थिती उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांची झाली आहे. कालपर्यंत विधान परिषदेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत फिरणारे सचिन अहिर आज शिंदेसेनेच्या तंबूत दाखल झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मार्मिक भाषेत टीका केली आहे.

"आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्यांची वाट का पहावी?" असे म्हणत पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे? अशी उद्विग्न भावना राऊत यांनी या ओळींमधून व्यक्त केली आहे.

ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार फुटल्यानंतर नुकताच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी मराठवाड्याचा दौरा केला. रक्ताचे पाणी करून ज्या आमदार, खासदारांना निवडून दिले, मंत्री केले तेच आज पक्ष संकटात असताना उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जात आहेत.

नेते, आमदार, खासदार जरी पक्ष सोडून जात असले तरी निष्ठावंत शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यातून व्यक्त केला होता. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कितीही आले आणि गेले तरी शिवसैनिकाच्या मनगटात राज्यात पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा भगवा फडकवण्याची धमक आहे, ही भावना रुजवण्यासाठी आणि शिवसैनिकाला दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्यात आले होते. खासदार, आमदार फुटत असताना संघटना बळकट राहावी यासाठी दौरे, तर दुसरीकडे कालपर्यंत सोबत असलेले आमदारही आता पक्षात थांबेनासे झाले आहेत.

गद्दारांना तुडवा, असा आदेश खासदार संजय राऊत यांनी आपल्या शिवसैनिकांना या मराठवाड्यातील दौऱ्यात दिला होता. ऑपरेशन तुडवा सुरू करत शिवसैनिकांनी हिंगोलीचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना रस्त्यावर उतरून विरोध सुरू केला होता.

आतापर्यंत झालेल्या फोडाफोडीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू सांभाळत संजय राऊत यांनी भाजपच्या दिल्ली ते गल्लीतील नेत्यांना सळो की पळो करून सोडले. आपल्या धारदार भाषेत केलेल्या टीकेने शिंदेंच्या शिवसेनेप्रमाणेच भाजपालाही ती झोपल्याचे दिसून आले होते. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच सचिन अहिर यांच्यासारखा आमदार उपसभापती पदासाठी पक्ष सोडून गेल्यानंतर मात्र संजय राऊत हे कमालीचे नाराज आणि हताश झाल्याचे दिसून आले. त्यांनी एक्स वरून केलेल्या पोस्टमध्ये आपल्या भावना सौम्य शब्दात व्यक्त केल्या आहेत.

आतापर्यंत माध्यमांसमोर कसलाही मुलाहिजा न बाळगता गद्दारांना शिव्या हसाडणारे संजय राऊत सचिन अहिर यांच्या पक्ष सोडून गेल्यानंतर मात्र उद्विग्न झाले आहेत. या उद्विग्नेतून केलेली त्यांची पोस्ट राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT