Sanjay Patil Politics : शिवसेनेतील बंडानंतर भले भले लपून बसतात, शांत असतात; संजय दिना पाटील एवढे आक्रमक का?

Sanjay Patil Shiv Sena ubt : अवघ्या दोन वर्षात ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या संजय पाटलांची आक्रमक भाषा चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामागेराजकीय गणिते असल्याचे सांगितले जात आहे.
Sanjay Patil
Sanjay Patil sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Patil News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले. तब्बल सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. मात्र, या खासदारांमधील सर्वाधिक चर्चा होत आहे ती ईशान्य मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांची. ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी अगदी आक्रमक होत दिले आहे. त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना उद्देशून त्यांनी म्हटले की, 'माझ्या नादाला लागू नका. माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जीवाचा विमा काढून घ्या, मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन नाहीतर हॉस्पिटल पाठवीन.'

शिवसेनेतील बंडानंतर भले भले लपून बसतात, शांत असतात मात्र थेट रस्त्यावरून प्रतिआव्हान देणाऱ्या संजय पाटल यांच्यामागे नेमके कोण आहे. ज्यामुळे ते थेट ठाकरेंच्या भिडण्याची हिम्मत करत आहेत, याची चर्चा आहे. जाणून घेऊ संजय दिना पाटील यांचा सगळा इतिहास आणि ते आक्रमक असण्यामागचे राजकीय कारण.

संजय पाटील यांचे वडील दिना पाटील आमदार होते. काँग्रेसमधून त्यांनी भांडूपमधून निवडणूक देखील लढली होती. संजय पाटील हे पहिल्यांदा 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर भांडूपमधून पहिल्यांदा आमदार झाले. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते खासदार झाले. तीन हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, पुढे त्यांना सलग दोन वेळा 2014 आणि 2019 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

2024 लोकसभा निवडणुकीच्याआधी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. भाजप उमेदवार मीहिर कोटेचा यांचा पराभव करत ते दुसऱ्यांदा खासदार झाले. मात्र, अवघ्या दोन वर्षात त्यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामागे काही राजकीय गणिते असल्याचे सांगितले जात आहे.

खासदारकीचा शब्द...

शेवटपर्यंत संजय पाटील हे एकनाथ शिंदेंसोबत जाणार की नाही याची स्पष्टता नव्हती. याचे कारण बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांपैकी एकमेव मतदारसंघ असा आहे जिथे भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये लढाई झाली आहे. यवतमाळ, शिर्डी, परभणी, धाराशिव आणि हिंगोली या पाचही मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई झाली होती. या जागा ना भाजपने कधी लढवल्या नाहीत.

अनेक वर्षांपासून मुंबईतील 6 पैकी 3 मतदारसंघ भाजपकडे आणि तीन शिवसेनेकडे हे गणित राहिले आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघही अनेक वर्षांपासून भाजपकडे आहे. भाजपकडून मिहिर कोटेचा हे उमेदवार होते. तर यंदा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसकडून हा मतदारसंघ घेतला, पहिल्यांदाच लढवला आणि जिंकला देखील.

Sanjay Patil
Sanjay Dina Patil : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं संजय दिना पाटलांबाबत भाष्य : ‘ही वाक्ये आपलं राजकारण संपवून टाकतील, एवढचं लक्षात ठेवं, संजय’

आता संजय दिना पाटील शिवसेनेत आल्याने मुंबईतील चार मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडावे लागणार आहेत. पण ही जागा सोडण्यासाठी भाजप त्यातही देवेंद्र फडणवीस तयार नव्हते. त्यामुळे आपण शिंदेंसोबत गेलो तर ती जागा आपल्याला पुन्हा मिळेल की नाही याची संजय दिना पाटील यांना खात्री नव्हती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य मुंबईच्या जागेसाठी एकनाथ शिंदेंनी थेट अमित शाहांशी चर्चा करून जर संजय दिना पाटील शिवसेनेत आले तर त्यांच्यासाठी ही जागा सोडली जाईल, असा शब्द घेतला. शिंदेंनी देखील संजय दिना पाटील यांना ती जागा त्यांच्यासाठी सोडण्यात येईल, असा शब्द दिला आहे. त्यानंतरच ते शिवसेनेत येण्यासाठी तयार झाले.

मतदारसंघाची रचना

संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईचे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाची रचना पाहाता 2029 ची निवडणूक त्यांना अवघड जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. 2024 ला मानखुर्दे शिवाजीनगर मतदारसंघात तब्बल त्यांना एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. मात्र, इतर पाच मतदारसंघात त्यांना भाजपच्या उमेदवार मिहिर कोटेचा यांनी चांगली टक्कर दिली होती.

अखेर 29 हजार 861 मतांनी विजयी झाले होते. मात्र, भाजपची रणनीती पाहाता पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढून आपण येथून विजयी होऊ याची खात्री संजय पाटील यांना नव्हती. त्यामुळे पक्षांतर करून ही जागा आपल्याकडे कायम ठेवण्याची खेळी त्यांनी खेळली आहे. आता समोर भाजपचा उमेदवार नसणार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेही पुन्हा संघटना उभी करणे आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळेच शांत असणारे संजय पाटील थेट संजय राऊत आणि शिवसैनिकांना आव्हान देण्याची भाषा करत असल्याचे बोलले जात आहे.

हिंदुत्व कार्डवर विश्वास...

संजय पाटील यांनी पक्षांतर केल्याने मराठी मतदार त्यांच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावर आपण मूळ शिवसेनेते एकनाथ शिंदेंसोबत जात असल्याचे ते सांगत आहेत. शिवाय हिंदुत्व कार्डमुळे दुरावलेली मते आपल्याला मिळतील, अशी रणनीती त्यांनी आखली आहे. ईशान्य मुंबईतील मुलुंड, घाटकोपर भागातील गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी हिंदुत्व कार्ड गेम चेंजर ठरले, असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे 2029 ची निवडणूक त्यांच्यासाठी अवघड ठरणार नसल्याचे सांगितले जात आहे.

मुलीचे राजकीय भवितव्याचा विचार

भांडूपमधील वाॅर्ड क्रमांक 114 मधून संजय पाटील यांच्या कन्या राजूल पाटील या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. मात्र, स्थानिक राजकारणात त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडूनच विरोध केला जात आहे. त्यांचे नेतृत्व मान्य केले जात नाही. त्यामुळे संजय पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जात त्यांनी आपल्या मुलीचे पुढील राजकीय भवितव्याची सोय केल्याचे मानले जात आहे.

भांडूपचे स्थानिक आमदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अशोक पाटील हे आहेत. त्यांच्याशी संजय पाटील यांचे सूर जुळले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राजूल पाटील यांच्यासाठी पुढील निवडणुकीत रस्ता मोकळा असेल, असे समीकरण आहे. त्यासाठीच ठाकरेंच्या शिवसैनिकाविरोधात संजय पाटील आक्रमक झाल्याचे दिसून येतात. दरम्यान, राजूल पाटील यांनी आपण ठाकरेंसोबत असल्याचे सांगितले आहे. मात्र, अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी ही खेळी असल्याचे सांगितले जात आहे.

Sanjay Patil
Shivsena UBT News उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आणखी एक बडा नेता सोडणार साथ

गद्दार नॅरेटिव्हला उत्तर

संजय पाटील यांची आक्रमक भाषा ही ठाकरेंच्या शिवसेनेकडून गद्दार म्हणून संजय पाटलांबाबत नॅरेटिव्ह तयार केले जात आहे. त्याला उत्तर असल्याचे मानले जात आहे. जर गद्दार नॅरेटिव्ह यशस्वी झाले तर त्यांना भविष्यात राजकारण करणे अवघड जाईल, त्यामुळेच रणनीती आखत आक्रमक भाषेचा वापर करत ते उत्तर देत आहेत. आम्ही फुटलो नाही, तर खरी शिवसेना आणि खरी युती आम्हीच पुढे नेतोय, हे ठरवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com