Heavy rush of aspirants form NCP SP for municipal council election forms in Satara district. Sarkarnama
महाराष्ट्र

Satara Politics : साताऱ्यात महायुतीच्या 4 मंत्री अन् 4 आमदारांना टफ फाईट; शशिकांत शिंदेंनी बालेकिल्ल्यात दाखवली ताकद

Satara Politics : नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. सातारा, फलटण, वाई, म्हसवड, महाबळेश्वर येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ४२ हून अधिक इच्छुकांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेतले.

Hrishikesh Nalagune

Satara Politics : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात पहिल्याच दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वाधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. आतापर्यंत सातारा, म्हसवड, फलटण, वाई, महाबळेश्वर, या परिषदांसाठी ४२ च्या वर अर्ज या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुकांनी घेतले आहेत. त्यामुळे परिषदांच्या निवडणुकीत भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही इच्छुकांनी पसंती दिल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात ९ नगरपरिषद आणि मेढा नगरपंचायतीची निवडणूक घोषित झाली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, आमदार, खासदार असल्याने महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. या सगळ्यांनी आपापल्या विचारांचे जास्तीतजास्त नगरसेवक कसे निवडून येतील, यासाठी फील्डिंग लावली आहे. पण विरोधात असूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी ताकद दाखवून दिली आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्या मनोमिलनातून भाजपच्या चिन्हावर सातारा नगरपरिषदेची निवडणूक लढली जाणार आहे. दोन्ही राजे सध्यातरी एकत्र लढणार आहेत; पण पॅनेल किती होणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात दिसत आहे. सातारा पालिकेत दोन्ही राजे एकत्र असल्याने या पॅनेलमध्ये स्थान न मिळणाऱ्यांनी महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आधार घेतला आहे.

दोन्ही राजेंच्या पॅनेलला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नवीन पॅनेल करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश येताना दिसत आहे. आतापर्यंत सातारा पालिकेसाठी १५ जणांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे.

यासोबतच इतर पालिकांतून इच्छुकांनीही अर्ज नेलेले आहेत. यामध्ये वाई पालिकेसाठी ५, महाबळेश्वर पालिकेसाठी ९, म्हसवड पालिकेतील इच्छुकांनी १०, तर फलटण परिषदेत इच्छुकांनी २ अर्ज नेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ४२ च्या वर इच्छुकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला प्राधान्य दिले आहे. हे इच्छुक सर्वसामान्य असले तरी त्यांच्या माध्यमातून स्थानिक आघाड्या व नेत्यांच्या पॅनेलपुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

आतापर्यंत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत निश्चिती नसली तरी अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची तयारी करत आहेत. त्यांची नावे लवकरच बाहेर येतील. त्यामुळे परिषदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही आपले आव्हान उभे करण्याचा तयारी केल्याचे चित्र आहे. त्यामध्ये त्यांना कितपत यश येणार, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

शशिकांत शिंदेंच्या रणनीतीकडे लक्ष :

या पक्षाकडून सर्वाधिक इच्छुक सातारा, महाबळेश्वर, वाई, म्हसवड पालिकेसाठी आहेत. त्यामुळे येथील मंत्री शंभुराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील यांच्यासह स्थानिक आमदार, खासदारांच्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून केलेल्या पॅनेलपुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आव्हान उभे करणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे हे आता कोणती रणनीती आखणार, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT