Maharashtra school leaving certificate correction rules Sarkarnama
महाराष्ट्र

School Leaving Certificate Correction: शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार! न्यायालयाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

School Leaving Certificate correction after leaving school: शालेय रेकॉर्डमध्ये नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली चूक विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतरही दुरुस्त करता येईल , असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे.

Mangesh Mahale

Court order on school leaving certificate correction: शाळा सोडल्यानंतर शालेय रेकॉर्ड किंवा प्रमाणपत्रातील चूक दुरुस्त करता येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो.

मात्र, आता अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शालेय रेकॉर्डमध्ये नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली चूक विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतरही दुरुस्त करता येईल , असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे.

या निर्णयाचा थेट परिणाम अशा विद्यार्थ्यांवर होणार आहे, ज्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात नाव, जन्मतारीख किंवा इतर नोंदींबाबत अनवधानाने चूक झाली आहे. केवळ संबंधित विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे, या कारणावरून दुरुस्तीची संधी नाकारता येणार नाही. त्यामुळे चुकीच्या प्रमाणपत्रामुळे नोकरी, व्यवसाय, पुढील शिक्षण किंवा इतर महत्त्वाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हा निर्णय जालना जिल्ह्यातील जनाबाई हिमतराव ठाकूर यांच्या प्रकरणातून समोर आला. त्यांच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. मात्र, शाळा सोडल्यानंतर रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करता येत नसल्याचे सांगत विभागाने अर्ज फेटाळला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.

शासनाने माध्यमिक शाळा संहितेतील नियम २६.३ आणि २६.४चा आधार घेतला होता. या नियमांनुसार शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करता येते; मात्र शाळा सोडल्यानंतर अशी दुरुस्ती करता येत नाही, अशी शासनाची भूमिका होती.

दरम्यान, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाच्या यापूर्वीच्या निर्णयांमध्ये या मुद्द्यावर विसंगती असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कायदेशीर स्थिती स्पष्ट करण्यासाठी प्रकरण पूर्णपीठाकडे सोपवण्यात आले.

पूर्णपीठाने स्पष्ट केले की, चूक जाणीवपूर्वक केलेली नसून नजरचुकीने किंवा अनवधानाने झाली असेल, तर ती केवळ विद्यार्थी शाळेतून बाहेर पडला आहे म्हणून कायम ठेवता येणार नाही. विद्यार्थ्याला ती दुरुस्त करून घेण्याची संधी मिळणे आवश्यक आहे.

रेकॉर्ड दुरुस्तीच्या प्रक्रियेला न्यायालयीन संरक्षण

या निर्णयामुळे शाळा सोडल्यानंतर प्रमाणपत्रातील चुकीमुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी दुरुस्तीचा मार्ग खुला झाला आहे. चुकीच्या नोंदीमुळे भविष्यातील संधी गमावण्याची शक्यता कमी होणार असून, शालेय रेकॉर्ड दुरुस्तीच्या प्रक्रियेला न्यायालयीन संरक्षण मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT