“नॉट रिचेबल” म्हणून चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मागील 24 तासांपासून संपर्का बाहेर असलेल्या सहर शेख अचानक मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे सोशल मीडियावर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख सध्या बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपांमुळे कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात तपास सुरू झाल्यानंतर सहर शेख सार्वजनिकरित्या कुठेच दिसत नव्हत्या. त्यामुळे त्या नेमक्या कुठे आहेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आयपीएल सामन्यादरम्यान त्या वानखेडेच्या गॅलरीत दिसल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वळले.
सहर शेख यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर स्टेडियममधील एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओला त्यांनी “गेम ओव्हर” असा मजकूर दिला होता. त्याचबरोबर त्यांनी एक गाण्याची ओळही पोस्ट केली, ज्यातून त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर सूचक भाष्य केल्याचे बोलले जात आहे. “तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ...” या ओळींमुळे त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील रहिवासी असूनही महाराष्ट्रातील ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच, स्थलांतरितांसाठी आवश्यक असलेल्या नमुना 10 ऐवजी नमुना 8 चा वापर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणाची चौकशी ठाणे तहसीलदारांकडून सुरू असून सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्याचे समोर आले आहे.
जर या चौकशीत गैरप्रकार सिद्ध झाले, तर सहर शेख यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जात पडताळणी अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. या अहवालावर पुढील कारवाई अवलंबून असेल.
सध्या ठाणे महानगरपालिकेत एमआयएमचे 5 नगरसेवक आहेत. सहर शेख यांचे पद रद्द झाल्यास ही संख्या 4 वर येईल, ज्यामुळे पक्षाला मोठा राजकीय धक्का बसू शकतो. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.