Jalgaon News: राजकीय कारकीर्दमधील तब्बल 40 वर्षे भाजपमध्ये योगदान दिलेल्या आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडेंनी घरी जाऊन एकनाथ खडसेंची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. याचदरम्यान, खडसेंची भाजपशी वाढती जवळीक दर्शवणारी नवी राजकीय घडामोड समोर येत आहे.
विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांचा येत्या 2 सप्टेंबरला 75 वा वाढदिवस साजरा आहे. खडसेंचा हा सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची जय्यत तयारी त्यांच्या समर्थकांकडून सुरू आहे. खडसेंचा हा पंचाहत्तरी सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी कंबर कसली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंच्या यांच्या या सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. खडसेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील एकंदरीत आजपर्यंतचं राहिलेलं योगदान आणि सर्वपक्षीय संबंध यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातीलच नव्हे तर भाजपसह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना या सोहळ्यांचं आमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे.
एकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकनाथ खडसेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागली असतानाच या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांनाही या सोहळ्यात निमंत्रित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त साम वृत्तवाहिनीनं दिलं आहे.
भाजपप्रवेशाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे. लोकसभा निवडणुकीवेळीच खडसेंनी थेट दिल्लीत भाजपचे पक्षश्रेष्ठींशी गाठीभेटी वाढवल्या होत्या. तसेच अमित शाह व तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासोबतच्या भेटीचे फोटोही व्हायरल झाले होते. खडसेंनीही त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना दुजोरा दिला होता. पण महाराष्ट्रातील काही नेत्यांमुळे त्यांचा भाजपप्रवेश त्यावेळी जो काही वेटिंगवर पडला, तो आजही तसाच कायम आहे.
गेल्या आठवड्यात विनोद तावडेंनी खडसेंची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे खडसे हे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. या भेटीनंतर खडसे यांनी आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्यात कोणताही इंटरेस्ट राहिला नसल्याचं स्पष्ट करत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याची ठाम भूमिका मांडली होती.
भाजपच्या महाराष्ट्रातील संघर्षकाळात व जडणघडणीत एकनाथ खडसेंचं योगदान राहिलं आहे. त्यांची त्यांच्या राजकीय जीवनातील 40 वर्षांचा सर्वात मोठा कालावधी भाजपसोबत काढला आहे. तसेच त्यांची सून रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार असून मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्रीही आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या या पंचाहत्तरी सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
एकनाथ खडसेंच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला थेट अमित शाह यांनाच निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.शाह हे खडसेंच्या सोहळ्याला येणार का, महाराष्ट्र भाजपमधील कोणते नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसेंच्या भाजपममधील योगदानाची आठवण करुन दिली होती. त्यांनी भाजप पक्ष वाढवण्यात गेल्या 40 वर्षात अनेक नेत्यांचे योगदान लाभले आहे. त्यापैकी एकनाथ खडसे एक असल्याचं म्हटलं.
तसेच 40 वर्षे त्यांनी भाजपच्या विस्तारासाठी काम केले. काही चुका झाल्या असतील, म्हणून अमितभाई शाह यांनी काही चर्चा केली असती तर मला माहित नाही. नेते-कार्यकर्ते जीव लावून काम करत होते. काळाच्या ओघात काही घटना घडल्या आणि ते पक्षाच्या बाहेर गेले. आपल्या घरचे लोक बाहेर जाण योग्य नाही. त्यांना परत पक्षात घ्यायचे का नाही याबद्दल राष्ट्रीय नेतृत्वाने निर्णय घ्यावा, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.