Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. सुरुवातील अनेकांनी ईव्हीएमला दोष दिला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश होता. अलीकडे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. संघाने बारकाईने केलेले नियोजन आणि प्रचारामुळे भाजपला मोठे यश मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते महायुतीत सहभागी होणार अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले.
फडणवीस म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काँग्रेससोबत जातील आणि अजित पवार आमच्याकडे येतील हे कोणी सांगितले असते तर यावर कोणाचा विश्वास बसला नसता. मात्र हे घडले. अशा राजकीय आघाड्या आणि युती होण्याच्या मताचा मी नाही. मात्र 2019 ते 24 या दरम्यान ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे ठामपणे असे होणारच नाही किंवा होईलच हे आता कोणाला ठामपणे सांगता येत नाही.
नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यापैकी कोणाशी मैत्री करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ते म्हणाले राज ठाकरे मित्र आहेत. मात्र, उद्धव ठाकरे शत्रू नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापैकी कोणावर अधिक विश्वास ठेवाल असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याशी आधीपासूनच मैत्री आहे. अजित पवार परिपक्व राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी वेव्हलेंथ चांगली जुळते.
महाविकास आघाडीचे सरकार असताना आपल्यावर वैयक्तिक टीका केली जात होती. अनेकांनी टार्गेटच केले होते. हे सर्व कसे सहन केले, संयम कुठून आणला यावर ते म्हणाले, जग हे टीकाटीपणी करणाऱ्या आणि शिव्याशाप देणाऱ्याला लक्षात ठेवत नाही. याची प्रेरणा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेतली. कोणी काहीही आणि कितीही बोलले तरी ते उत्तर देत नाहीत, शांतपणे आपले काम करीत असतात. आज त्यांनी इतिहास घडवला. दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. मीसुद्धा त्यांचेच अनुकरण केले. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीच्या काळात उपमुख्यमंत्री व्हायचे नाही असे ठरवले होते. सत्तेची लालसा असल्याचे कोणी म्हणू नये असा विचार मी त्यावेळी केला होता. मात्र पक्षाच्या नेत्यांनी आदेश दिला त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. आज त्यांचा निर्णय योग्य होता असे दिसते.
पक्षापेक्षा कोणी मोठा नाही
भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला आवडेल का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, पक्ष जो आदेश देईल तो मान्य करण्याचे संस्कार माझ्यावर संघाने घडवले आहेत. उद्या पक्षाने घरी बसण्यास सांगितले तर मुकाट्याने घरी जाईल. आज मी जो काही आहे तो पक्षाच्या पाठिंब्यावर आहे. पक्षातून बाहेर पडल्यास माझी किंमत शून्य आहे. मी विधानसभेची निवडणूक जिंकणे सोडा डिपॉजिटही वाचवू शकणार नाही, असे सांगून फडणवीस यांनी पक्षापेक्षा कोणी मोठा नाही, असा संदेशही यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.