अतिवृष्टीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असून शहरांनाही मोठा फटका बसला आहे.
शरद पवारांनी महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांना दिलासा म्हणून कर्जमाफी देण्याचा सल्ला दिला आहे.
शेतकरी संकट टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी समाजातून होत आहे.
Maharashtra Flood News : किल्लारीचा भूंकप, राज्यातील दुष्काळ अशा अनेक नैसर्गीक आपत्तीच्या काळात राज्याचे कणखरपणे नेतृत्व करत या संकटातून नागरिकांचे संरक्षण करण्याचा अनुभव गाठीशी असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा राज्य सरकारला काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. महाराष्ट्रात पूर, अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातले आहे. शेती, पीकं, घरे, पशूधनाची मोठी हानी झाली आहे. अशावेळी राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनाची काही महत्वपूर्ण कामे तातडीने हाती घ्यावी, अशा सूचना शरद पवारांनी सरकारला केल्या आहेत.
या संदर्भात शरद पवार (Sharad Pawar) यांनी सविस्तर भूमिका समाज माध्यमातून मांडली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची सूचनाही यातून करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वीच शरद पवार यांनी सरकारला नुकसानग्रस्त भागांचे दौरे राजकीय नेत्यांनी करू नये, त्याने प्रशासनावर ताण येतो आणि त्याचा परिणाम मदत कार्यावर होतो, असे म्हणत सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे कान टोचले होते. त्यानंतर आता पुन्हा शरद पवारांनी राज्य सरकारला काही महत्वाच्या सूचना करत सल्लेही दिले आहेत.
राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे. शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपुर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत, असे मी सुचवू इच्छितो.
पंचनामा प्रक्रीयेसाठी मुदतीचे बंधन नको
अभुतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत उरकणे अशक्य आहे. पंचनाम्यांच्या आधारे नुकसानीचा अहवाल राज्यशासनास सादर केल्यानंतर नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानाची दखल घेतली जात नाही. उदा. अतीवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छप्परांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तू यांची पडझड होते. पाणी ओसरल्यानंतर पिके व पशूधन व इतर बाबींची हानी निदर्शनास येते. अशा नुकसानीचे देखील पंचनामे होऊन आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी.
नुकसान भरपाई सोबतच पुनरुज्जीवनाचा आराखडा
वस्तुत: आपदग्रस्तांना दिली जाणारी मदत ही नुकसान भरपाई नसून अंशत: दिलासा असतो. शेतकरी व सामान्य जनता आपत्तीने कोलमडून गेली असल्याने ह्या नुकसान भरपाई सोबतच पुनरूज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा. ह्यात पिकांच्या पुनर्पेरणी व पुनर्लागवडीसाठी विशेष मदत , फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष मदत यांचा समावेश असावा.
वाहून गेलेली किंवा नापीक झालेली जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करावा. लहान-मोठे बंधारे, सिंचन कालवे, विहिरी, पंपिंग यंत्रणा व इतर सिंचन साधनांची दुरुस्ती व गाळ काढण्याची तसेच शेतकऱ्यांच्या बांध-बंदिस्तीची कामे हाती घ्यावीत. पुनर्बांधणी व पुनरूज्जीवनाची कामे मनरेगा कामांतून कशी होतील, आपदग्रस्तांच्या हातांना काम कसे मिळेल याचे देखील नियोजन करावे. शाळा, आरोग्य, वीज, रस्ते व इतर पायाभूत सुविधांच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा तयार करावा. पाऊस कमी झाल्यावर व पूर ओसरल्यानंतर ह्या आराखडयाची अंमलबजावणी तातडीने कशी होईल याकडे लक्ष द्यावे.
साहित्य वाटपाचा कार्यक्रम घ्या
अतीवृष्टी आणि पूराने नागरीकांचे संसारपयोगी साहित्य (भांडी, कपडालत्ता, फर्निचर वगैरे) नष्ट झाले आहे. शालेय साहित्य, चारा व शेतीची साधने, व्यवसायिक साहित्य यांची नासधूस झाली आहे. ह्या जंगम वस्तूंचा देखील पुरवठा करण्याचे नियोजन करावे व त्या वेळेत पुरवण्यात याव्यात.
शेतकरी हिताचे निर्णय..
पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथील करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा लाभ मिळेल. खाजगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ व दिरंगाई होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे. वित्तीय संस्थांकडून कर्जदार शेतकरी व व्यवसायिक यांच्याकडून होणारी वसूली तात्काळ तहकूब करावी आणि शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.
मानसिक, सामाजिक आधार..
पत्तीग्रस्तांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत. बाधीत व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, याकडे सत्वर लक्ष द्यावे. ह्या अभुतपूर्व संकटात शासकीय यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे, जनतेने धीराने घ्यावे. यापूर्वीही अशा संकटांतून मार्ग काढून आपण उभे राहिलो आहोत. तसे यावेळी ही पुन्हा उभे राहू, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
प्र.१. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कुठे बसला?
उ. ग्रामीण भागात शेती आणि अर्थव्यवस्था सर्वाधिक कोलमडली आहे.
प्र.२. शरद पवारांनी काय सल्ला दिला आहे?
उ. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्र.३. अतिवृष्टीचा शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला?
उ. पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
प्र.४. शहरांवर कसा परिणाम झाला आहे?
उ. शहरातील अर्थव्यवस्थेलाही पुरवठा खंडित होणे आणि महागाई यांचा फटका बसला आहे.
प्र.५. सरकारकडून काय अपेक्षा आहे?
उ. तातडीची मदत, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठी ठोस योजना लागू करणे ही प्रमुख अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.