New Dehli News : शिवसेना चिन्ह-पक्ष आणि आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील ध्रुव मेहता यांच्या युक्तिवादानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. पक्ष आणि चिन्हाच्या वादातील न्यायालयीन सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असतानाच एकनाथ शिदेंच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल प्रतियुक्तिवाद करत आहेत. यावेळी सिब्बल यांनी मुद्द्यालाच हात घेतला असून 21 जून रोजी मूळ पक्ष कोणाचा होता हे ठरवणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. सिब्बल यांच्या या सवालाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची धाकधूक वाढली आहे.
सुप्रीम कोर्टात बुधवारी शिवसेना (Shivsena) चिन्ह-पक्ष युक्तिवाद सुरु होताच कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. 21 जून रोजी मूळ पक्ष कोणाचा होता हे ठरवणे महत्त्वाचे आहे. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या आदेशात शिंदे गटाच्या 26 जूनच्या ठरावाचा आधार घेतला. या ठरावाला 31 आमदारांचा पाठिंबा असल्याचे नमूद करून विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे गट हाच खरा राजकीय पक्ष असल्याचा निष्कर्ष काढला.
कपिल सिब्बल (Kapil sibbal) म्हणाले, 'मूळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोणता गट करतो, याचा प्राथमिक निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात' विधानसभा अध्यक्षांसमोरील अपात्रतेची कार्यवाही आणि निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत होणारी कार्यवाही या दोन्ही स्वतंत्र आणि वेगळ्या आहेत. विधानसभा अध्यक्षांना हे ठरवायचे होते की, एखाद्या सदस्याने स्वतःच्या कृतीतून स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे का आणि त्यामुळे तो अपात्र ठरतो का. यासाठी संबंधित सदस्याचे वर्तन महत्त्वाचे आहे. मूळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोणता गट करतो, याचा प्राथमिक निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात.
समजा, सरकारमधील सत्ताधारी पक्षाचे बहुमत केवळ चार-पाच आमदारांचे आहे. अशा परिस्थितीत एका पक्षाचे सहा आमदार पक्षाच्या भूमिकेशी असहमती दर्शवून दुसऱ्या बाजूला जाऊ शकतात. त्यामुळे सरकारचे बहुमत कोसळू शकते. अशा कृतीला पक्षांतर किंवा बंडखोरी म्हणायचे की स्वसंरक्षणाची कृती? अशा प्रकारच्या राजकीय खेळीचे न्यायालयाने गांभीर्याने परिणाम तपासले पाहिजेत. एखाद्या राजकीय पक्षाला सत्ता मिळवायची असेल किंवा सरकार स्थिर ठेवायचे असेल, तर बहुमताचे स्वरूप लक्षात घेऊन अशा राजकीय हालचाली केल्या जातात. सध्या जे घडत आहे, ते याचाच भाग आहे, असेही कपिल सिब्बल म्हणाले. यानंतर सिब्बल म्हणाले की, त्यांनी न्यायालयासमोर प्राथमिक भूमिका मांडली असून आता ते आपल्या लेखी युक्तिवादाकडे येऊ इच्छितात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.