Shiv Sena Symbol Row : शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना मानून धनुष्यबाण चिन्ह दिले. आता न्यायालयासमोर या निर्णयाच्या घटनात्मक, कायदेशीर आधाराची तपासणी होत आहे. मंगळवारी या प्रकरणी सुनावणी सुरू असताना न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षांतराचे घटनात्मक पाप करणाऱ्या आमदारांच्या गटाला पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळू शकते का? असा प्रश्न विचारला.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर न्यायलयाने प्रश्न उपस्थित केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे देशभरात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धीतीवर शंका उपस्थित केली जात आहे. विरोधकांनी तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आयोगाच्या कारभाराविरोधात आंदोलनं सुरू केली आहेत. अशातच आता शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणात न्यायालयाने थेट आयोगालाच प्रश्न विचारला आहे.
त्यामुळे आत पुन्हा एकदा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर पक्षाच्या चिन्हामागील भावना आणि पक्षाची ओळख ही पक्षांतर करणार्यांबरोबर राहणार की पक्षांतराला विरोध करणार्या सदस्यांबरोबर, असा प्रश्नही न्यायालयाने सुनावणीदरम्यान उपस्थित केला आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर शिवसेनेतील फुटीशी संबंधित याचिकांवर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी एकानाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी पक्ष कोणता हे ठरवताना आयोगाने विधिमंडळातील बहुमताचा आधार घेणे योग्य असल्याचा युक्तीवाद केला. शिवाय चिन्ह वाटपाच्या नियमांनुसार विधिमंडळातील बहुमत ही कसोटी अद्याप वैध असल्याचा दावाही त्यांनी केला.
यावर न्या. बागची यांनी ज्या सदस्यांविरोधात अपात्रतेची कार्यवाही सुरू आहे आणि जे नंतर अपात्र ठरू शकतात, त्यांच्या संख्येच्या आधारे पक्षाचे बहुमत कसे ठरवता येईल? घटनात्मक पाप करणार्या व्यक्तींसाठी पक्षचिन्हाची भावना लागू होईल की त्या घटनात्मक पापाविरोधात तक्रार करणार्या व्यक्तींसाठी? असा सवाल उपस्थित केला.
शिवाय अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाचा निर्णय घेताना या परिस्थितीचा पुरेसा विचार केला का, असंही न्यायालयाने विचारलं. दरम्यान, मंगळवारची सुनावणी अपूर्ण राहिली असून आजही या प्रकरणावर युक्तिवाद होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.