Shinde Vs Thackeray
Shinde Vs Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Shinde Vs Thackeray : दसरा मेळाव्यानंतर वर्धापन दिनावरुनही राजकारण तापणार; शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार व १३ खासदारांनी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली होती. शिंदे गटानं भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. राज्यात सातत्यानं ठाकरे आणि शिंदे गटातला संघर्ष आणि आऱोप प्रत्यारोप दिवसागणिक वाढतच राहिले आहेत. यानंतर शिवसेनेचा दसरा मेळाव्यावरुन देखील चांगलंच राजकारण तापलं होतं. अखेर शिवतीर्थावर उध्दव ठाकरेंचा आणि बीकेसीच्या मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. मात्र, आता पुन्हा शिंदे व ठाकरे गट शिवसेनेच्या वर्धापनादिनावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

शिवसेने(Shivsena)चा 19 जून रोजी वर्धापन दिन असतो. गेली सहा दशकं हा शिवसेनेकडून मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. मात्र, यंदा मात्र शिवसेनेचे दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत. शिवसेना आणि ठाकरे गट आपापले सोहळे करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेकडून आमदार आणि पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच वर्धापन दिन हा आनंदोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शिवसेनेच्या इतिहासांत प्रथमच दोन वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगानं या अगोदरच शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)ना मोठा धक्का मानला गेला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिला होता. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या बहुमत चाचणीसह इतर निर्णयावर ताशेरे देखील ओढले आहेत.

तसेच उध्दव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार आम्ही परत आणण्याचा विचार केला असता असं स्पष्ट मतही निकालात नोंदवलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिंदे सरकारला न्यायालयानं कायदेशीर अभय दिलं होतं. यामुळे शिंदेंचं राजकीय वजन वाढलं.

ठाकरे आणि शिंदे गट तयारीला....

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी उध्दव ठाकरेंना आव्हान दिल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यामुळे उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पद तर गमवावे लागलेच शिवाय महाविकास आघाडी सरकारही कोसळले. त्यानंतर शिंदेंकडून ठाकरे गटाला वारंवार धक्क्यावर धक्के दिले जात आहे. तसेच ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांना आपल्यासोबत घेण्यासाठीही शिंदे आग्रही भूमिकेत आहेत.

ठाकरे गटही १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाला असून शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापनाचं ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT