Balasaheb Thackeray Photo Tearing Controversy; Shaina NC Sarkarnama
महाराष्ट्र

Shaina NC : आधी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला, आता माफी मागितली; भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा...'

Shaina NC Apology Over Balasaheb Photo Row : सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पानं फाडताना अनावधानाने शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. यानंतर आज त्यांनी माफी मागितली आहे.

Aslam Shanedivan

Maharashtra Politics : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांच्यावर सध्या टीकेची झोड सुरू आहे. सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडण्याच्या नादात त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. यावरून आता राज्यात गदारोळ उठला असून, शिंदेंच्या शिवसेनेविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेला आणि विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. शायना एनसी यांच्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून, ठिकठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. दरम्यान, आता शायना एनसी यांनी आपल्या कृतीबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनावधानाने बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्यामुळे शायना एनसी टीकेच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पत्रकार परिषदेनंतरच त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली होती. यावर त्यांनी स्पष्टीकरण देताना, मी बाळासाहेब ठाकरे यांचा नाही, तर मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला असल्याचे सांगितले. तसेच मणिशंकर अय्यर यांचा फोटो वारंवार फाडणार असल्याचेही म्हटले होते.

मात्र, हा वाद इतका वाढला की, राज्यभर त्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. या सर्व घडामोडींनंतर शायना एनसी यांनी अखेर माफी मागितली आहे. त्यांनी याबाबत माफी मागणारी पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये 'बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत होते', असे त्यांनी म्हटले आहे.

शायना एनसी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व. मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते.

बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे. कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते.

बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की, बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही!

सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा! जय हिंद, जय महाराष्ट्र! असे शायना एनसी म्हणाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT