Maharashtra Political Crisis; MLA Disqualification Case, Eknath Shinde And Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Disqualification Case : धनुष्यबाण कुणाचा? सुनावणीत शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपचा मुद्दाच खोडून काढला

Maharashtra Political Crisis : आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपवर केलेल्या दाव्यावर महत्त्वाचा युक्तिवाद झाला.

Aslam Shanedivan

Shivsena MLA Disqualification News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या प्रकरणातील सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या सुनावणीदरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे वकील ॲड. ध्रुव मेहता यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत महत्त्वाचे युक्तिवाद केले. सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपमध्ये स्पष्टता नव्हती. हा व्हीप केवळ बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात होता. त्यामध्ये बैठकीचा कोणताही विशिष्ट अजेंडा नमूद करण्यात आला नव्हता, असा दावा मेहता यांनी न्यायालयासमोर केला.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या सुनील प्रभू यांच्यासह दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने ॲड. ध्रुव मेहता युक्तिवाद केला. ठाकरे गटाने सादर केलेला व्हॉट्सॲप मेसेजचा स्क्रीनशॉट हा या प्रकरणातील एकमेव पुरावा असल्याचे नमूद केले. तर २१ जून रोजी सुनील प्रभू यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीचा कोणताही ठोस अजेंडा नव्हता. केवळ बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीच्या वेळेबाबतही मेहता यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. बैठक दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी आयोजित करण्यात आली होती. मात्र, एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना बैठकीचा व्हॉट्सॲप संदेश १२ वाजून ३१ मिनिटांनी मिळाला. म्हणजेच बैठक सुरू होण्याची वेळ उलटल्यानंतर संदेश पाठवण्यात आला, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे व्हीप आणि बैठकीच्या प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे मेहता यांनी मांडले.

याशिवाय, काही आमदार इतरांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला होता. योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे आणि लांडे या आमदारांनी बैठकीनंतर काही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. असे असतानाही त्यांच्याविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल करण्यात आल्याचा मुद्दा मेहता यांनी उपस्थित केला.

सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपमध्ये बैठकीचा अजेंडा आणि निर्देश स्पष्ट नव्हते. त्यामुळे केवळ बैठकीला उपस्थित न राहिल्याच्या कारणावरून आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला. मतदान न करणे आणि पक्षविरोधी कृती करणे या दोन वेगवेगळ्या बाबी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ मधील कलम २९अ(५) चा संदर्भ देत पक्षांतर्गत लोकशाही आणि नियमित निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पक्षाच्या अंतर्गत कारभारात लोकशाही प्रक्रिया आणि नियमांचे पालन आवश्यक असल्याचे मेहता यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आजची सुनावणी पूर्ण झाली असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या (बुधवारी) दुपारी २:०० वाजता होणार आहे.

व्हीपमधील कथित त्रुटी, बैठकीचा अस्पष्ट अजेंडा आणि व्हॉट्सॲप संदेश पाठवण्याच्या वेळेवरून शिंदे गटाने ठाकरे गटाच्या दाव्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादातील पुढील सुनावणीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT