

Maharashtra politics : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पक्षनिष्ठा, विचारधारा याबाबत सातत्याने ठोस भूमिका मांडली जाते. सातत्याने पक्ष बदलणार नेते, लोकप्रतिनिधींचे ते नेहमीच जाहीरपणे कान उपटतात. विशेष म्हणजे मागील काही वर्षांत भाजपमध्येच सर्वाधिक इनकमिंग असूनही ते सतत यावर बोलत आले आहेत. विचारधारा अन् पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या प्रत्येक नेत्याची हीच भावना असते. पण मागील काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा पुरता विचका झाला आहे. निष्ठा म्हणजे काय भाऊ, असे म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला. या खासदारांनी लोकसभेत गट तयार करून तो शिवसेनेत विलीन केला. तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे लवकरच त्याला अधिकृत मान्यताही मिळेल. ही झाली तांत्रिक बाब. पण पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी ही अत्यंत जिव्हारी लागणारी बाब ठरली.
२०२२ मध्ये शिवसेनेत पहिल्यांदाच उभी फूट पडली अन् तब्बल ४० हून अधिक आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी गाठले. त्यानंतर शिंदेंनी मुंबईत येऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे अन् त्यांच्या नेत्यांच्या तोंडून सातत्याने गद्दार या शब्दाचा उद्घोष होऊ लागला. सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडल्याने या शब्दाला अधिक धार आली. ते एवढ्यावर थांबले नाही. सहा खासदारांचे ठाकरेंना सोडून जाणे, पक्ष अन् कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का होता. राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही हेच घडले. पक्षाचे दोन तुकडे झाले. अनेकांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यामुळे आता नेमका कुणावर विश्वास ठेवायचा, कुणाची निष्ठा खरी, कोणत्या नेत्याची कोणती विचारधारा... आता कशाचा मागमूस राहिलेला नाही.
उद्धव ठाकरे यांच्याकडून सहा खासदारांच्या मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात आले. त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. नेहमीच्या शैलीत त्यांनी गद्दार वगैरे शब्दांचा भडिमार करत सहा जणांचा समाचार घेतला. त्यांच मंचावर इतर स्थानिक नेत्यांकडून आम्ही ठाकरेंची साथ सोडणार नाही, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशा आणाभाका घेतल्या. पण त्यावर ठाकरेंना तरी विश्वास बसला असेल का?
पक्षाचे आमदारही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदेंच्या नेत्यांकडून केला जात असताना ठाकरेंना मन स्थिर कसे असेल? पक्षाचे धाराशिवमधील आमदार कैलास पाटील हे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे अत्यंत विश्वासू. ओमराजे यांनी सोशल मीडियात ठाकरेंसोबत दोघांचा फोटो बॅनरला ठेवला होता. यावरून दोघांमधील राजकीय संबंध स्पष्ट दिसतात. ओमराजेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हा बॅनर हटविला. आता दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षाच्या बांधावर एकमेकांविरोधात उभे ठाकतील.
कैलास पाटील यांनी त्याची सुरूवात केली आहे. त्यांच्याप्रमाणे (ओमराजे) शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द पाटील यांनी दिला आहे. त्यावर उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्या-शिट्ट्या वाजवत जोरदार प्रतिसाद दिला. पण त्याचवेळी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली नसेल का? ओमराजे हेही पक्षनिष्ठेबाबत बेंबीच्या देठापासून बोलत असायचे. काहीही झाले तरी ठाकरेंना सोडणार नाही, म्हणायचे. थेट निष्ठेचा मिटर वगैरे बोलायचे. पण विकासनिधीच्या नावाखाली त्यांनी ठाकरेंची साथ सोडली.
ओमराजेंनी ठाकरेंना सोडून जाणे, शिवसैनिकांसह इतर पक्षाच्या कार्यकर्ते, नेत्यांना धक्का देणार होते. सोशल मीडियात त्याचे अजूनही पडसाद उमटत आहेत. त्यामुळे आता कैलास पाटलांसह कोणताही नेता पक्षनिष्ठेच्या गप्पा मारताना ऐकलं की लोकांचा पहिला प्रश्न असतो, काय गॅरंटी?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.