Prime Minister Narendra Modi Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : शिक्षणमंत्र्यांची विकेट जाताच संजय राऊतांचा हल्लाबोल, 'सरकारला झुकावेच लागले आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा...'

Sanjay Raut Targets Narendra Modi Government Education Minister Resignation : मुंबईतील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनसे आणि शिवसेनेनं संयुक्तपणे 'तिरंगा विजय रॅली' व जल्लोष सभा झाली.

Aslam Shanedivan

Mumbai News : नीट पेपरफुटी प्रकरणात कॉक्रोच जनता पार्टी, विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षांनी आंदोलनाचे अस्त्र उगारल्यानंतर अखेर मोदी सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला. सीजेपीच्या मागणीनुसार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. तसेच इतरही मागण्या मान्य केल्या. यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्तपणे 'तिरंगा विजय रॅली' व जल्लोष सभा घेतली. याच सभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, "शक्य नाही" म्हणणाऱ्या सरकारला युवाशक्तीसमोर झुकावेच लागले. आता देशाच्या पंतप्रधानांपासून ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला काहीच हरकत नाही, असे म्हणत निशाणा साधला आहे.

राऊत यांनी, नक्कीच, युवाशक्तीपुढे १२ वर्षांनंतर आजच्या मोदी सरकारला झुकावे लागले. त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. खरं म्हणजे सरकारने कायम जनतेसमोर नम्रता ठेवली पाहिजे. देशात किंवा राज्यात जिथे जिथे भाजपचे सरकार आहे, तिथे विनम्रता आणि संयम हे शब्द त्यांच्या शब्दकोशातूनच नष्ट झाले आहेत. त्यामुळे शेवटी "शक्य नाही" म्हणणाऱ्या सरकारला युवाशक्तीच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. याचा आनंद सर्वांनाच होणार आहे. कारण मोदींसारखे लोक जेव्हा झुकतात, तेव्हा हिटलरला झुकवल्याचा आनंद होतो, असा टोला लगावला आहे.

तरीही संयम राखला पाहिजे. या लढ्यात २० ते २१ मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेकांनी लाठ्या खाल्ल्या, डोकी फुटली, पॅलेट गनच्या गोळ्या झेलल्या. काहींची दृष्टीही गेली आहे. हे विसरता येणार नाही. आनंद साजरा करतानाही हे लक्षात ठेवले पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. मोर्चा निघणार होता, पण त्याचे प्रयोजन राहिले नाही. जंतर-मंतरवरील आंदोलनही संपले आहे.

सर्वांना धन्यवाद देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत कोणत्याही पक्षाचा झेंडा फडकवला जाणार नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. सर्वांनी या रॅलीत सहभागी व्हावे. व्यासपीठ नसेल. फक्त दोन भाषणे होतील—शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची. आज रविवार असल्याने मुंबईकरांना आम्ही लवकर मोकळे करू, जेणेकरून ते आपल्या कुटुंबासोबत दिवसाचा आनंद साजरा करू शकतील, असे राऊत म्हणाले.

मनुष्यवधाचा गुन्हा

तसेच यावेळी आदित्य ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. तर त्यांच्या हलगर्जीपणामुळे पेपरफुटी झाली आणि २० जणांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. जेव्हा एखाद्या आत्महत्येसाठी कोणी जबाबदार असते, तेव्हा त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांपासून ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला काहीच हरकत नाही, जर हे खऱ्या अर्थाने कायद्याचे राज्य असेल तर. तसेच आता नवीन शिक्षणमंत्री आले आहेत. त्यांना विचारा, 'नीट' म्हणजे काय? असाही टोला राऊत यांनी लगावला आहे.

आंदोलनाचा बोध घ्या...

या यशस्वी आंदोलनातून एवढाच बोध घ्यावा लागेल की, सत्ता आहे, बहुमत आहे म्हणून जास्त माज दाखवू नका. हिटलरसारखे वागाल, तर हिटलरच्या मार्गाने जावे लागेल. मुसोलिनीसारखे वागाल, तर मुसोलिनीप्रमाणे अंत होईल. गद्दाफीसारखे वागाल, तर गद्दाफीसारखाच अंत होईल. हा बोध आहे. राज्यकर्त्यांनी हा धडा घेतला असेल, तर उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात त्याचे प्रतिबिंब दिसेल.

आघाडी मजबूत

इंडिया आघाडीचा ब्लॉक मजबूत करण्याचे प्रयत्न आमचे सुरू असून, अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा झाली. राहुल गांधी यांच्याशी दूरध्वनीवर प्रदीर्घ चर्चा झाली. इतर नेत्यांशीही चर्चा सुरू आहेत.

विरोधी पक्षांना बोध

जंतर-मंतरवर तुम्ही काय पाहिले? सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या. लाल बावटा, निळा बावटा आणि इतर सर्व झेंडे बाजूला ठेवून सर्वजण एकत्र आले. विरोधी पक्षांनीही आपापले झेंडे बाजूला ठेवून एकत्र यायला हवे. ज्या दिवशी ते मनाने आणि भूमिकेने एकत्र येतील, त्या दिवशी नरेंद्र मोदी किंवा त्यांचे सरकार एक दिवसही सत्तेत राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर नीट पेपरफुटी आंदोलनाप्रमाणेच ईव्हीएम घोटाळा, मतचोरी, आमदार-खासदार फोडाफोडी आणि संविधानावर होणाऱ्या हल्ल्याविरोधातही एकत्र संघर्ष झाला, तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळून जावे लागेल.

पवार अनुभवी नेते

शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते असून, सध्या देशाच्या राजकारणातील ते ज्येष्ठ नेते आहेत. मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकले असावे, त्यावर विचार केला असावा. मात्र, जो राजकीय धक्का द्यायचा होता, तो जंतर-मंतरवरून देण्यात आला आहे.

प्रधानांना सवाल

दहा दिवस मन दुःखी होते, असे म्हणत आहेत. मग विद्यार्थ्यांना उपाशी का ठेवले? लगेच राजीनामा द्यायला हवा होता. त्यांच्या राजीनामा पत्रात पेपरफुटीबद्दल, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबद्दल, पोलिसांच्या लाठीमाराबद्दल, महिलांचे कपडे फाडल्याबद्दल किंवा मुलींच्या विनयभंगाबद्दल पश्चात्तापाची एक ओळही नाही. त्यांनी राष्ट्रीय एकतेसाठी राजीनामा दिला, असे म्हटले आहे. पण ते राष्ट्रीय एकतेसाठी थांबले होते का? असा सवालही राऊत यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT