Uddhav Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांनी आपल्याच खासदाराला दिला दणका; परभणीत समर्थक जिल्हाप्रमुखाला हटवले!

Shivsena UBT News Uddhav Thackeray: संजय जाधव यांनी पक्षांतर केले, तर त्यांच्यासोबत कोण कोण जाऊ शकतो? याचा अंदाज घेतला होता. याचा आढावा उद्धव ठाकरे यांना देऊन जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावण्यात आले होते.

Jagdish Pansare

Parbhani Politics News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघालाही आता हादरा बसला आहे. महाविकास आघाडीकडून 2024 मध्ये मशाल चिन्हावर खासदार झालेले संजय उर्फू बंडू जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेशाचे निश्चित केले आहे. जाहीर कार्यक्रमांमधून तळ्यात-मळ्यातची भूमिका घेणाऱ्या, उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकांना दांडी मारणाऱ्या खासदार संजय जाधव यांना आता उद्धव ठाकरे यांनीच पहिला दणका दिला आहे.

संजय जाधव यांची शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची पूर्ण तयारी झाल्याची माहिती पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा दौरा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना दिली होती. त्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावण्यात आले होते. या बैठकीतही उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांच्या पक्षांतर आणि त्यांच्या जाण्याने पक्षाला किती नुकसान होऊ शकते याचा अंदाज घेतला होता.

पक्षाचे अधिक नुकसान टाळण्यासाठी संजय जाधव यांच्या निर्णयाची वाट न पाहता त्यांच्या समर्थकांचे पंख छाटण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी सुरू केले. यातूनच संजय जाधव यांचे कट्टर समर्थक असलेले पक्षाचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावर हटवून त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नवे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. परभणी आणि गंगाखेड या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या दोन संघटनात्मक बैठकांना खासदार संजय जाधव आणि त्यांच्या समर्थक पदाधिकाराऱ्यांनी दांडी मारली होती. या पार्श्वभूमीवर 23 एप्रिल रोजी शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा करत संजय जाधव यांनी पक्षांतर केले, तर त्यांच्यासोबत कोण कोण जाऊ शकतो? याचा अंदाज घेतला होता. याचा आढावा उद्धव ठाकरे यांना देऊन जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावण्यात आले होते.

उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. याचा पहिला दणका त्यांनी बैठकीला गैरहजर राहिलेले जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांना बदलत दिला आहे. संजय जाधव यांनी अनेक कार्यकर्त्यांची सत्तेतील पक्षासोबत जाण्याची इच्छा असल्याचे विधान दोन दिवसापुर्वी एका जाहीर कार्यक्रमात केले होते.

सध्या मी पक्षातच आहे, पण पुढचं काही सांगता येणार नाही, असे सांगत आपल्या पक्षांतराचा निर्णय पक्का असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आता जे जाणार आहेत, त्यांना थांबवायचे नाही, निष्ठावंतांना सोबत घेतल नव्याने पक्षाची बांधणी करण्याचा निर्णय घेत मोठे बदल करण्याचे धोरण ठेवले आहे. याचा पहिला दणका जाधव समर्थक जिल्हाप्रमुखाला बदलत उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT