Sanjay Raut Questions NCP Merger Sarkarnama
महाराष्ट्र

NCP merger : विलीनीकरणाचा खेळ हास्यास्पद! संजय राऊतांचा शरद पवारांना थेट इशारा; म्हणाले, 'मंत्रीपदासाठी हपापलेले...'

Sanjay Raut calls NCP merger talks ridiculous, questions ministerial ambitions and advises Sharad Pawar against compromising his political legacy : राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर राऊतांचा संताप; 'दोन-चार लोकांसाठी आयुष्यभर जपलेले सत्त्व नष्ट करू नका' म्हणत पवारांसह सुप्रिया सुळे, जयंत पाटलांनाही दिला सल्ला!

Pradeep Pendhare

Sanjay Raut Questions NCP Merger Talks : केंद्रातील भाजप मोदी सरकारने लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) बिल आणण्याची तयारी सुरू केली असतानाच, महाराष्ट्रात राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघू लागले असतानाच, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्रात शरद पवार यांनी उपस्थित केलेला परदेशी मुद्दा आल्याने, त्यावर इंडिया आघाडीत चर्चा सुरू आहेत.

अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, विलीनीकरणाचा खेळ दिवसेंदिवस हास्यास्पद ठरत आहे! असा टोला लगावला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्यावर टिप्पणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील आमदार-खासदारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना, मंत्रीपदासाठी हपापलेले दोन-चार लोक असू शकतात, असा टोला देखील त्यांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले, "शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत (NCP SP) मंत्रीपदासाठी हपापलेले दोन–चार लोक असू शकतात. त्यांच्यासाठी शरद पवारांनी त्यांच्या जीवनाचे इतकी वर्षे पाळलेले सत्त्व नष्ट करावे हे बरे नाही. या खेळात कोण कोणात विलीन होणार हा पुढचा प्रश्न. भाजपच्या पायाशी बुटचाटेगिरी करणाऱ्या गटाशी शरद पवारांनी चर्चा करत बसावे व महाराष्ट्रात संभ्रम, संशयाचे वातावरण निर्माण व्हावे हे राज्याच्या परंपरेला शोभणारे नाही."

शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदेंसारख्या पुढाऱ्यांनी या खेळात वाहत जाऊ नये. ओंडकेही असेच वाहत जातात. विलीनीकरणाचा खेळ दिवसेंदिवस हास्यास्पद ठरत आहे! असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

केंद्रातील भाजप मोदी सरकारने 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण लागू करण्यासाठी आणि लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विचारात आहे. यासाठी लागणाऱ्या बहमुतासाठी सरकारकडे 15 ते 18 मतांच्या फरकाने बहुमत असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे.

सोनियांच्या पुस्तकात शरद पवारांचा 'तो' मुद्दा...

भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात दौरे वाढवले आहेत. आता रविवारी-सोमवारी (ता. 14 आणि 15) पुणे येथे दौऱ्यावर आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार आहे. यातच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय चर्चेला जोर धरला आहे. या दौऱ्यात काय घडते, याकडे लक्ष असताना, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्र पुस्तकात शरद पवार यांनी, त्यांच्याविषयी उपस्थित केलेल्या परदेशी मुद्दा देखील गाजतो आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाच्या टीकेचा परिणाम होणार?

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा दिल्लीत सुरू आहेत. यातच शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार राऊत यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना हास्यास्पद म्हणून, आणखीनच डिवचले आहे. या सर्वांचा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर काय परिणाम होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT