

Raj Thackeray over Chhath Puja controversy : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्रात छठ पूजेवरून भाजप आणि त्यांची सोशल मीडिया 'विषारी' संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, उत्तरप्रदेश निवडणुकांसाठी हा भाजपचा राजकीय संधीसाधूपणा आहे, असा खळबळजनक दावा केला आहे.
यासंदर्भात धर्मनिरपेक्षता विचारसरणी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याने राज ठाकरे यांच्या दाव्याचे समर्थन करत, भाजप मुंबईचा बिहार बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी, राज ठाकरे यांच्या दाव्याचे समर्थन केल्याने राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाजपविरोधी भूमिकेला काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी दिलेले समर्थनामुळे छठ पूजेच्या आयोजनाचा मुद्दा आता केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याला मराठी अस्मिता, मुंबईचे राजकारण, भाजपची उत्तर प्रदेशातील राजकीय रणनीती आणि विरोधकांची संभाव्य एकजूट, असे अनेक पदर निर्माण झाले आहेत.
काँग्रेसचे (Congress) हुसेन दलवाई यांनी माध्यमांशी बोलताना, राज ठाकरे यांनी 'एक्स' सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचे समर्थन केले. राज ठाकरे यांनी केलेला विरोध आणि त्यांचा विरोध पूर्णपणे योग्य आहे. हे लोक आपल्या मुंबईला बिहार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत का? हा काय प्रकार आहे? मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि मुंबई मुंबईच राहील, असे हुसने दलवाई यांनी म्हटले आहे.
मुंबईची बिहार किंवा गुजरात होणार नाही. आम्ही हे अजिबात होऊ देणार नाही. छठपूजा हा आपला सण नाही. महाराष्ट्रातील लोकांचा हा सण नाही. ही छठपूजा आली कुठून? आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही, अशीही भूमिका छठ पूजेविषयी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी मांडली. हुसेन दलवाई यांची ही भूमिका म्हणजे काँग्रेसची भूमिका आहे का, असा आता प्रश्न पडू लागला आहे.
राज ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्रात होत असलेल्या छठ पुजेवरून, पोस्ट करताना, भाजप आणि त्यांच्या सोशल मीडियाचा विषारी संघर्ष निर्माण करण्याच्या हेतूवरच बोट ठेवले. भाजपचे यामागील उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीतील कुटनीती सांगत, या धार्मिक कार्यक्रमातून संघर्ष निर्माण करण्याचा डाव कसा आहे, हे सांगताना मराठी माणसाला, मुंबईकरांना, मनसे सैनिकांना अन् भाजप विरोधी पक्षांना साधव करत भाजपचा राजकीय डाव उधळण्याचा आणि त्यांच्या सापळ्यात न अडकण्याचे आवाहन केले आहे.
राज ठाकरेंनी भाजपच्या धर्म-जातीवादी विषारी राजकारणावर देखील घणाघात केला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेला आता काँग्रेस नेते देखील समर्थन करून लागले आहेत. त्यामुळे हा मुद्दा संपूर्ण राज्यात भाजपविरोधी पक्ष संवेदनशीलपणे हाताळण्याची तयारी, सुरू केल्याचे दिसते.
मनसे, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष विरोधकांनी समुद्रकिनारे आणि नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी छटपूजा नैसर्गिक जलस्रोताऐवजी कृत्रिम तलावांमध्ये करावी, अशी मागणी केली आहे. बाणगंगा (मुंबई) आणि बदलापूरच्या उल्हास नदी परिसरातही छटपूजेच्या आयोजनाला मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. मुंबईतील वडाळा आणि CSMTसह मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवर छठ पूजेनिमित्त मोठ्या आवाजात भोजपुरी गाणी वाजवली जात असल्याबद्दल शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
दरम्यान, मिथिला छठ पूजा संघाने मुंबईतील गिरगाव चौपाटीवर 15 आणि 16 नोव्हेंबरला छठ पूजेसाठी स्टेज उभारण्याची आणि विधी करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक सुव्यवस्था, पर्यावरण, स्वच्छता आणि 2014/2018 च्या न्यायालयीन आदेशांचा हवाला देत तातडीची परवानगी देण्यास नकार दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.