Prakash Ambedkar Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : मराठा आरक्षणावर माझ्याकडे तोडगा; पण प्रकाश आंबेडकर म्हणाले, या सरकारला सांगणार नाही

कैलास शिंदे

Jalgaon News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक एकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कोंडीत पकडले आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकते, त्याबाबतचा तोडगा आपल्याकडे आहे. परंतु, या सरकारला सांगणार नाही. नवीन येणाऱ्या सरकारला निश्चित सांगू, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ॲड. आंबेडकर हे जळगाव दौऱ्यावर असून, ते मीडियाशी बोलत होते. या वेळी ते म्हणाले की, माझ्याकडे मराठा आरक्षणाचा असलेला तोडगा जर या सरकारला सांगितला तर ते त्याचे खोबरं करून टाकतील. त्यामुळे आपण राज्यात नवीन येणाऱ्या सरकारला हा तोडगा निश्‍चित सांगणार आहोत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण निश्‍चित देता येऊ शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

नागपुरात अधिवेशन नव्हे तमाशा !

नागपुरात सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनावरही त्यांनी जोरदार टीका केली, ते म्हणाले, नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नव्हे तर केवळ तमाशा सुरू आहे. त्याठिकाणी विरोधक आणि सत्ताधारी कोण आहेत हेच कळत नाही. ज्वलंत प्रश्‍नावर सभागृहात चर्चा होतांना दिसत नाही, ज्या प्रश्‍नाचे महत्व नाही त्यावर चर्चा होत आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यांना बियाणे खराब मिळाले आहे, असे अनेक प्रश्‍न आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नच दिसत नाही. त्याशिवाय संसदेत बेरोजगारीच्या प्रश्‍नावर युवकांनी उडी मारली. त्या बेरोजगारीच्या प्रश्‍नावरही चर्चा होतांना दिसत नाही. विरोधकांनी जे प्रश्‍न विचारायचे आहेत ते सत्ताधारी विचारीत आहेत, आणि सत्ताधाऱ्यांनी जे सांगायचे आहे, ते विरोधक सांगत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक

इंडिया आघाडीच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, इंडिया आघाडीचे आमंत्रण आले तर आपण निश्‍चीत बैठकिस जाणार आहोत. शिवसेना (ठाकरे गट) यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबधाबाबत बोलतांना ते म्हणाले, आमचे वर्षभरापूर्वीच ठरलेले आहे. आम्ही एकत्र निवडणूका लढविणार आहोत.

गिरीश महाजन यांना आव्हान

मराठा आरक्षणाबाबत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलतांना ते म्हणाले, की राज्याचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी मराठा आरक्षणाची बाजू उच्च न्यायालयात यशस्वीपणे मांडली. परंतु, सुप्रीम कोर्टात त्यांना बाजू मांडण्यापासून का रोखण्यात आले. त्यांनी हजर राहू नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना असे आदेश का दिले याबाबतच उत्तर गिरीश महाजन यांनी अगोदर द्यावे, असे आवाहनही त्यांनी दिले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT