Rajkot Fort : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून दुर्घटना झाली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले होते. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.
राजकोट किल्ल्यावर लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) 60 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. ज्याचं काम देखील वेगाने सुरू झालं असून राजकोट किल्ल्यावर खोदकाम सुरू आहे. महाराजांचा पुतळा निर्मितीची जबाबदारी दिग्गज शिल्पकारावर सोपवण्यात आली आहे.
राजकोटमधील पुतळा दुर्घटनेनंतर राज्य सरकार 60 फुटी उंच पुतळ्याची निर्मिती करणार आहे. याआधी डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं. मात्र ऑगस्ट 2024 मध्ये अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला होता. त्यावरून राज्यभरातून जोरदार टीका झाली होती. मात्र, यावेळी पुतळा बनवतांना सर्व खबरदारी घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.
विशेष बाब ही की प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि अनिल सुतार हा पुतळा साकारणार आहेत. राज्य सरकारनं राम सुतार आर्ट क्रिएशन्स या कंपनीद्वारे हे काम दिले आहे. याआधी या कंपनीने गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांच्या भव्या पुतळ्याची निर्मिती केली आहे.
राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. इतर कोटेशनची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला 20.95 कोटींमध्ये हे काम देण्यात आले आहे.
प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याची निर्मिती करणार आहे. हा पुतळा 60 फूट उंच असेल तसेच नवीन पुतळा ब्राँझ धातूचा असेल. त्यावर 8 मिमी जाडीचं क्लॅडिंग असणार आहे.
मूर्ती पद्मश्री राम वानजी सुतार एक दोन नाही तर गेली 70 वर्षे शिल्प बनवत आहेत. आपल्या 99 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी आतापर्यंत 8000 हून अधिक शिल्प बनवली आहेत. ते मुळचे महाराष्ट्रातील धुलिया जिल्ह्यातील गोंदूर गावचे आहेत. तर त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 ला झाला होता. जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे. 1955 मध्ये ते दिल्लीत आले आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयात त्यांनी काम केले आहे. त्यापूर्वी ते मुर्ती बनविण्याचे काम करत होते.त्यांनी दिल्लीतील लक्ष्मी नगर भागात स्वतःचा स्टुडिओ उघडला आहे. त्यानंतर त्यांनी 2006 मध्ये साहिबााबादमध्ये कास्टिंग फॅक्टरी बांधली.
1954 ते 1958 या काळात अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांच्या कोरीव कामात त्यांचे मोठे योगदान होते. चंबळ स्मारक एका दगडात अशा प्रकारे कोरले गेले की आजही त्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या धरण प्रकल्प भाक्रा नांगल धरणात काम करणाऱ्यांच्या सन्मानार्थ कामगार पुतळा उभारण्याची जबाबदारीही देण्यात आली. युनोच्या मुख्यालयाबाहेर महात्मा गांधींचा पुतळ्याचीही निर्मिती त्यांनी केली आहे. याशिवाय अयोध्येतील लता चौकात वीणाचा मोठा पुतळाही त्यांनी साकारला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.