Nagpur News : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सातत्याने अनेक दावे आणि आरोप केले होते. तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारला लाडक्या बहिणी परक्या होतील. सरकार महिलांना अपात्र ठरवेल असा दावा करण्यात आला होता. तो आता खरा ठरत आहे. राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येताच योजनेतील पात्र महिलांना कात्री लावली आहे. आतापर्यंत महायुती सरकारने तब्बल पाच लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा सरकारवर टीका विरोधकांसह लाडक्या बहीण योजनेतील महिलांसह काही भाजप नेते करत आहेत. अशीच टीका भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करताना लाडकी बहीण योजना बंद करणे चुकीचे असल्याचा घरचा आहेर दिला आहे.
महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेला सत्तेत आल्यानंतर महायुतीने कात्री लावण्यास सुरूवात केली आहे. अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाईचा इशारा देताना पैसे वसूल करू असेही सरकारने म्हटले आहे. त्यामुळे घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सोडण्याचा निर्णय घेतलाय. यावर खुद्द महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनीच शिक्कामोर्तब करताना, तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची माहिती दिली आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापलेलं असून महायुतीतील भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे.
मुनगंटीवार यांनी, राज्यातील अधिकाऱ्यांनी राज्य चालवायचं, राज्याची अर्थव्यवस्था हाकायची असते. हे राजकर्त्यांचे काम नाही. राजकीय नेत्यांचे काम आपल्या कतृत्वाने गोरगरीबांसाठी योजना आखायच्या असतात. त्याचा समतोल राखणं राजकीय नेत्यांचे आहे. पण आता लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर ती बंद करणे सरकारचा चुकीचा निर्णय ठरेल. यामुळे राजकीय नेत्यांच्याबाबत अविश्वास जनतेत निर्माण होईल.
राज्यकर्ते म्हणून जेंव्हा फायदा देणारी योजना सुरू केली ती आता बंद करणे, असा विचार या जन्मात तरी आणता कामा नये, असा घरचा आहेर मुनगंटीवार यांनी महायुतीला दिला आहे. मुनगंटीवार यांनी, लाडकी बहीण योजना जाहीर झाली त्याचवेळी त्याचे सर्व निकष सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेकांनी ते पाळलेले नाहीत. मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने त्याची पडताळणी होऊ शकली नाही. पण आता पडताळणी होत आहे. शेवटी यात सरकारची चूक नाही. तर ही चूक ज्यांनी निकष पाळले नाही त्यांची आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. यावरून आता लाडक्या बहिणीमधली अस्वस्थता अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा वाढत असल्याने आर्थिक शिस्तीसाठी लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच सरकारने लावला आहे. डिसेंबरमध्ये 2 कोटी 46 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपये लाभ देण्यात आला होता. मात्र आता या योजनेला कात्री लावण्यात आली असून ती 2 कोटी 41 लाखांवर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.