TET Exam Maharashtra, Disabled Candidates Sarkarnama
महाराष्ट्र

TET Exam: दिव्यांग उमेदवारांना 15 टक्के गुणांची सवलत मिळणार? शिक्षण आयुक्तांना पत्र

TET Exam Maharashtra, Disabled Candidates: दिव्यांग उमेदवारांना TET परीक्षेत 15 टक्के गुणांची सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे. दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयाने शिक्षण आयुक्तांना याबाबत पत्र पाठवले आहे.

Mangesh Mahale

• दिव्यांग उमेदवारांना TET मध्ये 15 टक्के गुण सवलतीची मागणी

• दिव्यांग आयुक्तालयाचे शिक्षण आयुक्तांना पत्र

• 60 टक्क्यांऐवजी 45 टक्क्यांत पात्रतेचा प्रस्ताव

• राज्यातील हजारो दिव्यांग शिक्षक उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

TET Exam News: पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देणाऱ्या दिव्यांग उमेदवारांना 15 टक्के गुणांची सवलत देण्याबाबत दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयाने शिक्षण आयुक्तांना पत्र पाठवले आहे. दिव्यांग उमेदवारांना न्याय मिळावा आणि त्यांनाही शिक्षक भरती प्रक्रियेत समान संधी मिळावी, यासाठी ही महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.

दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयाने 1 जुलै 2026 रोजी शिक्षण आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात महाराष्ट्र राज्य दिव्यांग (अपंग) कर्मचारी संघटनेच्या निवेदनाचा संदर्भ दिला आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांनी दिव्यांग संवर्गातील शिक्षक उमेदवारांना TET परीक्षेत 15 टक्के गुणांची सवलत देण्याची मागणी केली होती.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांचे 21 प्रकार मान्य करण्यात आले आहेत. या संवर्गातील उमेदवारांना त्यांच्या दिव्यांगत्वामुळे TET परीक्षेत सर्वसामान्य उमेदवारांप्रमाणे गुण मिळविणे कठीण जाते. त्यामुळे त्यांना सवलत देण्याची आवश्यकता असल्याचे आयुक्तालयाने पत्रात नमूद केले आहे.

सध्या राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत माजी सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व कुटुंबीयांना TET परीक्षेत 15 टक्के गुणांची सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर दिव्यांग उमेदवारांनाही ही सवलत लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. म्हणजेच, सध्या पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या 60 टक्के गुणांऐवजी दिव्यांग उमेदवारांना 45 टक्के गुण मिळाल्यास पात्र ठरविण्याचा प्रस्ताव आहे.

या मागणीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो दिव्यांग शिक्षक उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT