Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेकडून एकमेकांना नेहमीच टार्गेट केलं जातं. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली होती. ठाकरेंनी अजित पवार म्हणतात, आता माझ्याकडे एकच आमदार आहे. पण त्यांना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नव्हते असा खोचक टोला लगावला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेला डिवचलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)च्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबिराचं नागपुरात आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अमोल मिटकरी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. या कार्यक्रमात मिटकरींनी नुसतं भाषण देऊन झालं असतं तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री झाले असते आणि त्यांचे 15 चे 50 आमदार झाले असते असा चिमटा काढला आहे.
मिटकरी नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरें(Raj Thackeray)वरही निशाणा साधला आहे. मिटकरी म्हणाले,अजित पवार यांना विनंती आहे की, आमच्या मित्र पक्षातील काही वाचळवीरांना आवरा नाही तर आपल्या पक्षात देखील बोलणारे लोकं आहेत.तसेच नुसतं भाषण देऊन झालं असतं तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री झाले असते. त्यांचे 15 चे 50 आमदार झाले असते असं विधान केलं आहे.
''...पण भाजपमध्ये खोटं बोलणारा पंतप्रधान होतो!''
राष्ट्रवादी पक्षात भाषण देणारा आमदार होतो. पण भाजपमध्ये खोटं बोलणारा पंतप्रधान होतो. खोटं हिंदुत्व ओबीसींवर लादण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. शिवाजी महाराजांचे राज्य मराठा भोसले यांसाठी नाही तर स्वराज्य होते, बलुतेदार सुखाने जगत होते. शिवाजी महाराजांचे हिंदू राष्ट्र हेच आमचं ध्येय असल्याचं मोहन भागवत सांगतात. थुंकणे ही आमची संस्कृती होती असं सांगितल जातं. आमची लढाई मंदिर मस्जिदसाठी नाही तर आमची लढाई सत्तापिपासू लोकांशी आहे जे माणसं मारत असल्याचा आरोप अमोल मिटकरीं(Amol Mitkari)नी केला आहे.
मोदी पुन्हा पंतप्रधान...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 72 वर्षानंतर पद देत नाही. मोदींचं वय 73 वर्ष आहे. मोदी थकले हे दाखविण्यासाठी यूपीमध्ये एन्काउंटर करून नव्या दमाचं नेतृत्व दाखवलं असल्याचं विधान केलं आहे. तसेच मोदींनी नवीन संसदेचं उद्घाटन केलं म्हणून ते पुन्हा पंतप्रधान होतील हे सांगता येत नाही असंही मिटकरी म्हणाले. या आधीच्या रेल्वे मंत्र्यांनी अपघात झाल्यास नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला. ज्याच्याकडे नैतिकता आहे तोच राजीनामा देतो असं म्हणत भाजपच्या रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मिटकरी यांनी केली.
...यावर चित्रा वाघ का बोलत नाही?
भारतीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर मोदी सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशातील महिला कुस्तीपटू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत.यावर मिटकरी यांनी भाजपच्या महिला नेत्यांवर निशाणा साधला आहे.
मिटकरी म्हणाले, ब्रिजभूषण सिंह विरोधात चित्रा वाघ का बोलत नाही. भाजपला भाजपचे नेते चालत नाही, पंकजा मुंडे, खडसे, बावनकुळे यांचं भाजपनं काय केलं? ज्या सनातनची शपथ काल मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यांनीच राज्याभिषेकाला विरोध केल्याचं मुख्यमंत्री विसरले का? भाजपला महिला चालत नाही, एक महिला मंत्री नाही, महिला राष्ट्रपती संसद उद्घाटनाला चालत नाही, ब्रिजभूषणला अटक केली जात नाही असा सवालही मिटकरींनी यावेळी उपस्थित केला आहे.
(Edited By DeepaK Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.