Bombay high Court Slam Tukaram Mundhe: मुंबई उच्च न्यायालयाने कठोर निरीक्षण नोंदवत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवायांवरून कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी न्यायालयाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवायांच्या पद्धतीवरून तुकाराम मुंढे यांच्या FDA ला झापले.
औषध निर्माण कंपनी 'कॅडिला'च्या काही औषधांच्या विक्रीवर आणि वितरणावर बंदी घालण्याच्या एफडीएच्या आदेशाला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने एफडीएच्या छाप्यावर ताशेरे ओढले.
एफडीएच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'तुम्ही तलवारीने मच्छर मारत आहात,' अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडक कारवायांवरून मुंबई उच्च न्यायालयाने विभागाला चांगलेच सुनावले आहे. औषध कंपनी कॅडिला फार्मास्युटिकल्सच्या काही औषधांच्या विक्री-वितरणावर FDA ने घातलेल्या निर्बंधांविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कारवाईच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
FDA कडे कारवाईचे अधिकार आहेत, मात्र अधिकारांचा वापर करताना कायद्याने निश्चित केलेली प्रक्रिया पाळणे आणि परिस्थितीनुसार योग्य तीच कारवाई करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने FDA च्या कारवाईची तुलना थेट ‘मच्छर मारण्यासाठी तलवार वापरण्या’शी केली. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील FDA च्या धडक कारवायांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर झाली. औषधांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यापूर्वी संबंधित कंपनीला योग्य संधी देण्यात आली होती का, तसेच FDA ने उपलब्ध अधिकारांचा परिस्थितीच्या तुलनेत योग्य पद्धतीने वापर केला का, यावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले.अधिकार हातात असणे आणि त्या अधिकारांचा योग्य पद्धतीने वापर करणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सुनावणीदरम्यान FDA च्या अधिकारांवर भाष्य करताना न्यायालयाने अत्यंत मार्मिक उदाहरण दिले. ‘तुमच्याकडे तलवार आहे, पण ती मच्छर मारण्यासाठी वापरत आहात,’ अशा शब्दांत न्यायालयाने विभागाच्या कारवाईवर ताशेरे ओढले.
कारवाई करण्याचा अधिकार असला तरी त्याचा वापर योग्य कारणासाठी आणि योग्य प्रमाणात झाला पाहिजे. विशेषतः औषधांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाचा थेट परिणाम रुग्णांवर होऊ शकतो, त्यामुळे अधिक काळजीपूर्वक प्रक्रिया राबवणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने सूचित केले.
कॅडिलाच्या काही औषधांच्या नावांमध्ये आणि ब्रँडिंगमध्ये साम्य असल्याचा FDA चा आक्षेप होता. औषधांमधील सक्रिय घटक वेगवेगळे असले तरी नावातील साम्यामुळे डॉक्टर, मेडिकल स्टोअरमधील कर्मचारी किंवा रुग्णांकडून चुकीचे औषध निवडले जाण्याची शक्यता असल्याचे FDA चे म्हणणे होते. या संभाव्य गोंधळामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा करत FDA ने संबंधित औषधांच्या विक्री आणि वितरणावर निर्बंध आणले. मात्र, या निर्णयामुळे कंपनीच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे सांगत कॅडिलाने न्यायालयात याचिका दाखल केली.
कॅडिलाच्या वतीने ज्येष्ठ वकील वीरेंद्र सराफ यांनी न्यायालयात बाजू मांडली. FDA च्या आदेशामुळे कंपनीच्या औषधांची विक्री थांबणार असून त्याचा मोठा आर्थिक परिणाम होणार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयानेही कारवाईपूर्वी संबंधित पक्षाला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
कोणत्याही संस्थेला कारवाईचे अधिकार दिले आहेत म्हणजे त्या अधिकारांचा अमर्याद वापर करता येत नाही, हा मुद्दा न्यायालयाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाला.
या प्रकरणात औषधांची उपलब्धता हा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. एखाद्या औषधाच्या विक्रीवर निर्बंध आल्यास त्या औषधावर उपचारासाठी अवलंबून असलेल्या रुग्णांची अडचण होऊ शकते. FDA चे प्राथमिक उद्दिष्ट नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे असले, तरी कारवाई करताना आवश्यक औषधांचा पुरवठा खंडित होणार नाही, याचाही विचार करणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
हायकोर्टाच्या सुनावणीनंतर FDA ने आपल्या भूमिकेत बदल करण्याची तयारी दर्शवली. कॅडिलाविरोधातील सध्याचा आदेश मागे घेऊन नवीन कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तयारी FDA ने दर्शवली आहे.
यानंतर कंपनीला आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. कंपनीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका FDA ने न्यायालयासमोर मांडली.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही काळात राज्यभर कारवायांचा वेग वाढला आहे. अन्नातील भेसळ, बनावट किंवा निकृष्ट खाद्यपदार्थ, गुटखा, बनावट औषधे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर विभागाकडून कारवाई केली जात आहे.मात्र, कॅडिला प्रकरणात हायकोर्टाने कारवाईच्या परिणामांपेक्षा तिची कायदेशीर प्रक्रिया आणि प्रमाणबद्धता महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता FDA पुढील कारवाई कोणत्या पद्धतीने करते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.