Marathwada Drought : मराठवाड्यासह राज्याला दसरा मेळाव्यांची परंपरा आहे. राज्याची राजधानी मुंबईत होणारे ठाकरे, शिंदे यांचे मेळावे, तर मराठवाड्यात पंकजा मुंडे, सुरेश धस आणि आता मराठा आरक्षण आंदोलक यांचा नारायण गडावरील दसरा मेळाव्यातील सहभाग हे नवे समीकरण पुढे आले आहे. या मेळाव्यांमधून समाजाला एकत्र आणणे, विचारांचे सोनें लुटणे, चांगल्या विचारांची देवाण-घेवाण आणि बंधूभाव वाढीला लागावा ही अपेक्षा असते. परंतु गेल्या काही वर्षापासून या दसरा मेळाव्यांना राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
या दसरा मेळाव्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. गेल्या वर्षी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 'ओला दुष्काळ', अशी परिस्थिती होती. तरी परंपराने चालणारे दसरा मेळावे आपापल्या नियोजित ठिकाणी झालेच होते. यंदा मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे, शेतातील पीकं करपली, पाण्याची तीव्र टंचाई, जनवारांचे चाऱ्याअभावी हाल, दसरा-दिवाळी सारखा सण तोंडावर असताना अद्याप शेतकर्याला सरकारी मदत मिळालेली नाही. अशावेळी दसरा मेळावे व्हावेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दसरा मेळाव्यांच्या माध्यमातून राजकीय नेते आपली ताकद दाखवतात, समर्थकांना एकत्र आणतात आणि आगामी राजकीय लढाईची दिशा स्पष्ट करतात. बीड जिल्ह्यातील भगवानगड आणि नारायणगडावरील मेळाव्यांपासून ते मुंबईतील शिवाजी पार्क आणि गोरेगाव येथील सभांपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्यांना विशेष महत्त्व आहे.
मराठवाड्यातील प्रमुख दसरा मेळाव्यांमध्ये भगवान भक्तीगड, सावरगाव घाट येथील पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सावरगाव घाट येथे राष्ट्रसंत भगवानबाबांच्या जन्मभूमीवर हा मेळावा होतो. वंचित, शोषित आणि ग्रामीण भागातील समर्थकांचा मोठा सहभाग या मेळाव्याला असतो. यंदा २० ऑक्टोबर रोजी हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याल उपस्थित राहावे, यासाठी पंकजा मुंडे यांनी समर्थकांना आवाहन केले आहे.
नारायण गडावरून जरांगे पाटील काय बोलणार? मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे नारायण गडावरील दसरा मेळाव्यात सहभागी होणार आहे. आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईला निघालेल्या जरांगे पाटील यांनी पाटोदा येथे आपले उपोषण स्थगित करत सरकारला तीन महिन्याची मुदत दिली आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्यावर विरोधक तुटून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण गडावरील दसरा मेळावा साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे सांगीतले असले तरी सर्वानी गडावर यावे असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना आणि समाज बांधवांना केले आहे. आरक्षण, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दुष्काळी मदत आणि सरकारवरील टीका हे मुद्दे त्यांच्या भाषणात राहण्याची शक्यता आहे.
या शिवाय शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची ऐतिहासिक परंपरा शिवाजी पार्कशी जोडलेली आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर या मेळाव्याला पक्षाच्या अस्तित्वाची आणि संघटनात्मक ताकदीची परीक्षा असे स्वरूप आले आहे. यंदा २० ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला मैदानाची परवानगी मिळाली आहे. तर नेस्को, गोरेगाव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यंदाचा मेळावा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मदत, सरकारची भूमिका आणि शिवसेनेची संघटनात्मक ताकद हे या मेळाव्यातील महत्त्वाचे विषय असणार आहेत.
गेल्या वर्षी, २०२५ मध्ये, मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पार्श्वभूमी मनोज जरांगे यांचा नारायणगडावरील मेळावा साधेपणाने आयोजित करण्यात आला होता, तर भाजप आमदार सुरेश धस यांनी आष्टीतील मच्छिंद्रनाथ गडावरील मेळावा स्थगित केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.