Sudhakar Badgujar, Harsha Badgujar Sarkarnama
महाराष्ट्र

Sudhakar Badgujar : बडगुजर यांच्या मदतीला पत्नी आल्या धावून; दादा भुसेंना दिला सल्ला...

Rajanand More

Badgujar Vs Dada bhuse News : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी नाशिक शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई बाँम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या समवेतचे छायाचित्र दाखवत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. त्यानंतर आता बडगुजर यांच्या पत्नी हर्षा त्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत.

विधानसभेमध्ये (Assembly) झालेल्या आरोपांना बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे. आपला सलीम कुत्ताशी (Saleem Kutta) काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना हर्षा बडगुजर (Harsha Badgujar) म्हणाल्या, ती क्लिप खोटी आहे. सलीम कुत्ता कोण हे माहिती नाही. सुधाकर बडगुजर हे नगरसेवक होते. त्यांना कार्यक्रमांना कुणीही बोलावू शकते. तिथे जावे लागते. त्या कार्यक्रमात एकत्रित नाचले म्हणजे दोघांची हातमिळवणी झाली असेल, असे होत नाही.

दादा भुसेंनी (Dada Bhuse) काय पाहिले. त्यांना कदाचित सगळे काही माहिती नसेल. कुणी काही म्हटले आणि ते बोलले, हे योग्य नाही. मला माझ्या पतीवर खूप विश्वास आहे. मी त्यांना ३३ वर्षे ओळखते. ते असे करूच शकत नाहीत. संजय राऊत यांच्यावरही अनेक आरोप झाले आहेत. त्यामुळे जे आरोप होतील, ते खरेच आहेत असे नाही. त्यामुळे विचार करून बोलायला हवे, असा सल्लाही हर्षा यांनी दादा भुसेंना दिला.

माझ्या पतीला अडकवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामागे त्यांचा काय विचार आहे, हे मला माहिती नाही. तो व्हिडीओ आत्ताचा नाही. मला वाटते १५-१६ वर्षांपूर्वीचा असावा. त्यावळी तर संपूर्ण शिवसेना एकत्र होती, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, सुधाकर बडगुजर यांनी भुसे यांच्याविरोधात ड्रग्ज प्रकरणात रान उठवले होते.

काय म्हणाले सुधाकर बडगुजर?

आरोपांना उत्तर देताना बडगुजर म्हणाले, आरोपांमध्ये काही तथ्य नाही. भुसे यांनी थोडासा अभ्यास करायला हवा होता. त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. राजकारणात येण्यापूर्वी भुसे नोकरी करीत होते. त्या नोकरीतून त्यांना का निलंबित करण्यात आले? हे त्यांनी सांगावे. त्यावर विचार केला नाही तर त्यांनी त्याचे आत्मपरीक्षण करावे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT