Mumbai News: लोकसभा निवडणुकीत काही अपवाद वगळात एकसंध राहिलेली इंडिया आघाडी आता विखुरली आहे. त्याला दिल्ली विधानसभा निवडणूक कारणीभूत ठरली आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकाकी पडली असून इतर सर्व प्रमुख मित्रपक्ष एकत्रित आले आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाही समावेश आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटण्याचे संकेत मिळत आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याआधी तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल या पक्षांनीही अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्यातरी इंडिया आघाडीतील एकही पक्ष काँग्रेससोबत नाही.
उद्धव ठाकरेंनी दिल्लीत काँग्रेसला दिलेला झटका अनेक अर्थांनी महत्वपूर्ण मानला जात आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे करिष्मा दाखवता आला नाही. आघाडीला 50 चा आकडाही पार करता आला नाही. आता पुढील काही महिन्यांत मुंबईसह राज्यांतील इतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
ठाकरेंनी आपले सर्व लक्ष मुंबईवर केंद्रीत केले आहे. त्यादृष्टीने पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज केलेले विधान आघाडीचे टेन्शन वाढविणारे आहे. दिल्लीत जे घडले ते मुंबईतही घडू शकते, असे म्हणत राऊत यांनी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना काँग्रेसला सोबत घेणार नाही, असे संकेत दिले आहेत. दिल्ली हे त्यासाठी ठाकरेंनी टाकलेले पहिले पाऊल असल्याची चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी एकला चलोची भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वाढली आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालावरही बरेच गणित अवलंबून आहे. काँग्रेसचे काही नेतेही दिल्लीत आप वरचढ असल्याचे मान्य करत आहेत. तिथे आघाडी व्हायला हवी होती, अशी बोलत आहेत. तिथे काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यास त्याचा परिणाम महाराष्ट्रातील आघाडीवरही होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.