Uddhav thackeray, abhijeet dipke  sarkarnama
महाराष्ट्र

CJP Protest : मुंबई-दिल्लीत पोलिसांची धरपकड अन् ठाकरेंच्या शिवसेनेची एन्ट्री; सीजेपीच्या आंदोलन सुरू असतानाच शिवसैनिकांना दिला महत्वपूर्ण आदेश

CJP protest latest news News : दिल्लीत इंडिया आघाडीने गेल्या चार दिवसापासून आक्रमकरित्या आंदोलन केले. त्यानंतर शनिवारपासून आता कॉक्रोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली. सीजेपीने शनिवारी दिल्लीत आंदोलनाची घोषणा केली होती.

Sachin Waghmare

Mumbai News : संपूर्ण देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात रान पेटले आहे. विरोधी पक्षाने सत्ताधारी मंडळींची मोठी कोंडी केली आहे. जागोजागी आंदोलन केली जात असल्याने सरकार पुढील अडचणी वाढल्या आहेत. आंदोलनात सहभागी होणाऱ्याला अटक केली जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीत पोलिसांनी सीजेपी नेते अभिजित दिपके यांच्यासह बड्या नेत्यांना ताब्यात घेतले. तर मुंबईतही तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पोलिसांकडून केल्या जात असलेल्या धरपकडीवरून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एन्ट्री केली आहे. त्यासोबतच सीजेपीच्या आंदोलनावेळी शिवसैनिकांना महत्वाचा संदेश दिला असल्याने येत्या काळात आता सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

दिल्लीत इंडिया आघाडीने गेल्या चार दिवसापासून आक्रमकरित्या आंदोलन केले. त्यानंतर शनिवारपासून आता कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) आक्रमक भूमिका घेतली. सीजेपीने शनिवारी दिल्लीत आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु सीजेपीच्या अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास यांना आंदोलानाआधीच पोलिसांनी विमानातून ताब्यात घेतले. आंदोलनाच्या एक दिवस आधी दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. तर 57 मेट्रो स्टेशन बंद केले.

मुंबईत सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून काही कार्यकर्त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मुंबईच्या या आंदोलनात महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी सहभागी होणार होते. परंतु त्याआधीच पोलिसांनी तुषार गांधी यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरे यांची एन्ट्री झाली. त्यांनी शिवसैनिकांना सीजेपीच्या आंदोलनावेळी घ्यावयाच्या भूमिकेविषयी महत्वाचा संदेश दिला. त्यामुळे येत्या काळात आता सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

मुंबईच्या विविध ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. हुतात्मा चौक ते ऑगस्ट क्रांती मैदानातही आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीनेही हुतात्मा स्मारक परिसरात आंदोलन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करत ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलनाला निघालेल्या तुषार गांधी यांना आधीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आदित्य ठाकरे हे डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेले आहेत.

डीएन नगरला पोहोचल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, भाजप (BJP) विरुद्ध संपूर्ण देश रस्त्यावर उतरला आहे. हे आपल्याला रस्त्यावर दिसतच आहे. आम्ही डीएन नगर येथे आलो आहोत. डी. एन. नगर येथे ताब्यात घेण्यात आलेल्या महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांना पोलिसांनी सोडले पाहिजे. वातावरण चिघळण्याआधी सोडले पाहिजे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. डीएननगर पोलीस स्टेशनबाहेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे व काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT